मुंबई, 24 जून- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती भोजपुरीमध्ये बोलताना दिसते. ऑफिसमधलं आपलं काम संपल्यावर सनी बॅग खांद्याला लावून निघण्यासाठी मागे वळते आणि म्हणते की, 'का बे, काम कर, मुझे छोड..' तिचा हा व्हिडिओ पाहून सनी नक्की भोजपुरी का बोलली याचा विचार जर तुम्ही करत असाल आणि ती आता भोजपुरी सिनेमांमध्येही एण्ट्री घेणार का असा प्रश्न जर तुमच्या मनाला पडला असेल तर असं काही होणार नाहीये. सनी कोणत्याही भोजपुरी सिनेमात नाही तर तिच्या आगामी कोका कोला सिनेमाच्या तयारीत आहे. भोजपुरी बोल पकडण्यासाठी ती प्रत्येक ठिकाणी हीच भाषा बोलताना दिसत आहे. आपल्या आगामी सिनेमात ती उत्तर प्रदेश आणि बिहारची भाषा बोलताना दिसणार आहे. चित्रीकरणासाठी ती सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे.
सनीचा हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी आहे. सिनेमांव्यतिरिक्त सनी तिच्या नवीन व्यवसायासाठीही सध्या चर्चेत आहे. 'द आर्ट फ्यूजन' या नावाने सनी काही तरी नवं सुरू करणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल माहिती दिली. सनीने लिहिले की, 'जेव्हा तुम्हाला आयुष्यात काही नवं करावसं वाटतं तेव्हा पुढे जा. प्रयत्न करा. कदाचित तुम्ही यशस्वी व्हाल किंवा अपयश मिळेल. पण कमीत कमी तुम्ही प्रयत्न तरी कराल. आमच्या नवीन आणि क्रिएटीव्ह वेंचरसाठी चिअर्स. आम्ही याची लवकरच सुरुवात करू.'