मुंबई, 08 एप्रिल : ‘ द कपिल शर्मा शो ’ मधून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता, कॉमेडियन म्हणजे सुनील ग्रोवर. त्याचे रिंकू भाभी, गुत्थी आणि डॉ. गुलाटी ही पात्रे चांगलीच लोकप्रिय झाली होती. कपिल शर्मा सोबत झालेल्या वादांमुळे 2018 मध्ये त्याने हा शो सोडला होता. त्यानंतर सुनील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. सुनीलला अजून कपिल शर्मामध्ये परत येण्यास चाहते विनंती करत असतात. त्याला अजूनही प्रेक्षक त्याला शोमध्ये मीस करतात. कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने हा शो सोडला होता. पण आता पाच वर्षानंतर पुन्हा कपिल शर्मा सोबत काम करताना दिसणार असल्याची शक्यता आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील ग्रोव्हरला कपिल शर्मासोबत पुन्हा काम करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. कारण वर्षापूर्वी कपिल शर्माने मुलाखतीत सांगितले होते की, ‘सुनीलचे त्याच्या शोमध्ये मनापासून स्वागत करण्यास मी तयार आहे’. या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील ग्रोव्हर म्हणाला कि, ‘आता तर असं काही नाहीये, तुम्ही मला हा प्रश्न विचारलाय तुम्हीच मग त्यांनाही विचारा. मी सध्या व्यस्त आहे आणि मी जे करत आहे त्यात आनंदी आहे. तो देखील व्यस्त आहे आणि चांगले काम करत आहे. मी पण खूप छान काम करत आहे. मी आधीच माझ्या आयुष्यातील या टप्प्याचा आनंद घेत आहे. एक कलाकार म्हणून एक नवीन अनुभव जगत आहे. मला मजा येत आहे आता दुसरी काही योजना नाही.’ असं उत्तर त्याने दिलं आहे.
सुनील ग्रोवरच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं तर त्याच्याकडे सध्या बरेच प्रोजेक्ट्स आहेत. तो नुकताच ‘युनायटेड रॉ’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. मानव शाह यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. 8 भागांची ही मालिका यूकेमध्ये शूट करण्यात आली होती. यामध्ये लंडनमध्ये स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांची कथा दाखवण्यात आली होती. यामध्ये सतीश शाह, सपना पब्बी, निखिल विजय, मनु ऋषी चढ्ढा इतर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
तसंच तो आता शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ऍटली दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात संजय दत्तचा कॅमिओही आहे. सुनीलला आता शाहरुख खान सोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आपल्या विनोदी शैलीने लोकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवर सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून विविध फोटो आणि मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या विनोदाचे अनेक चाहते असून तो आपल्या चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही.