मुंबई, 22 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधव चे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. मराठीसोबतच त्याने हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण आज यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा होता. कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. याबाबतच सिद्धार्थने मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाचं सिद्धार्थ सुत्रसंचालन करत आहे. हा कार्यक्रम सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे. दररोज मालिकांमधून भेटीला येणारे कलाकार या कार्यक्रमात वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतात. सिद्धार्थ जाधवच्या उत्साहामुळे या कार्यक्रमाला वेगळेच स्वरूप मिळते. नुकतंच याचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये सिद्धार्थला एक खास सरप्राईज देण्यात आलं. हे खास सरप्राईज पाहून मंचावरच सिद्धार्थ रडू लागला. हेही वाचा - Sayali sanjeev : अबब! सायली संजीवने आतापर्यंत ‘एवढ्या’ मुलांना केलंय प्रपोज; अभिनेत्रीचा मोठा खुलासा ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमामध्ये सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यांना अचानक मंचावर पाहून सिद्धार्थ भावुक झाला. सिद्धार्थचे आई-वडील व त्याच्या भावाने कार्यक्रमाध्ये हजेरी लावत त्याला सरप्राईज दिलं. आपल्या जवळच्या व्यक्तींना मंचावर पाहून सिद्धार्थलाही सुखद धक्का बसला. आपल्या आई-वडील व भावाला मिठी मारून तो रडू लागला. त्यानंतर आपल्या खासगी आयुष्याबाबत तसेच घरातीच आर्थिक परिस्थितीबाबत त्याने मोठा खुलासा केला.
तो म्हणाला, “दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाबाहेर माझे बाबा खाली पेपर टाकून त्यावर झोपायचे. त्यांना अभिमान आहे की आपल्या पोराने आज त्याच्यासमोरच असलेल्या टॉवरमध्ये घर घेतलं आहे.” आपल्या खासगी आयुष्याबाबत सांगत असताना सिद्धार्थसह मंचावर असणारी इतरही मंडळी सुद्धा भावुक झाली. सिद्धार्थने आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत केवळ अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे.
सिद्धार्थ जाधव लवकरच ‘गांधी टॉक्स’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी या कलाकारांसोबत काम करणार आहे. त्याच्या आनंदाच्या बातमीने त्याचे चाहते खूप खूश आहेत. तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम व्यतिरिक्त मराठी भाषेतही तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.