मुंबई, 20 ऑक्टोबर : सर्वांचा लाडका **’**आपला सिद्धू’ म्हणजेच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनेता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून त्याचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यानं दादा कोंडकेसारखा अभिनय केला आहे. याशिवाय व्हिडीओमध्ये त्यानं केलेला लुकही हुबेहुब दादा कोंडकेसारखा आहे. सिद्धार्थ ‘ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं’ हा डायलॉग म्हणत असलेला पहायला मिळतोय. शिवाय व्हिडीओच्या बॅग्राउंडलाही त्यांनं ढगाला लागली कळं हे गाणं लावलं आहे. त्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. हेही वाचा - Bigg Boss च्या घरात शाब्दिक युद्ध; किरण मानेंचा तेजस्विनीला सल्ला, म्हणाले तुला… ‘क्या बात है, दादाची आठवण करुन दिलीस, खूप छान अभिनय केलाय, खुप दिवसांनी दादांची आठवण आली सिध्दार्थ भाऊ, 1 नंबर लय भारी कडक भावा, जबरदस्त लईच भारी राव’, अशा अनेक कमेंट सिद्धार्थच्या या व्हिडीओवर येत आहेत. सिद्धार्थचं भरभरुन कौतुक होताना दिसतंय.
दरम्यान, सिद्धार्थ जाधवनं गांधी जयंती निमित्तानं चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. तो लवकरच ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी या कलाकारांसोबत काम करणार आहे. ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर यांनी केलं आहे. हा एक डार्क कॉमेडी असेल असे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव गांधी टॉक्स असे असले तरी हा एक मूकपट असणार आहे. म्हणजेच यात कोणताही कलाकार काहीही बोलताना दिसणार नाही. हावभाव आणि हावभावातच अभिनय केला जाईल.
‘गांधी टॉक्स’ तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम व्यतिरिक्त मराठी भाषेतही तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सिद्धार्थचे चाहते त्याची नवी भूमिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.