मुंबई, 15 डिसेंबर : ‘क्रॅक्डाऊन’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘गिल्टी माइंड्स’ सारख्या शानदार वेब सीरिजमुळे प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर तिच्या उत्तम कामामुळे ओळखली जातेय. श्रियाचा प्रत्येक प्रोजेक्ट आधीच्या प्रोजेक्टपेक्षा वेगळा ठरतो. प्रत्येक भूमिकेत ती वेगळेपण शोधत असते. अशातच आता श्रियाचं नवं काम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आतापर्यंत श्रियानं केलेल्या कामांपैकी तिची ही भूमिका वेगळी ठरणार आहे. ‘ताजा खबर’ या नव्या वेब सीरिजमधून श्रिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये श्रिया एका सेक्स वर्करची भूमिका साकारणार आहे. सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. श्रियानं तिच्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण ताजा खबर मध्ये ती साकारणार असलेली भूमिका इतरांपेक्षा वेगळी ठरणार आहे. ताजा खबर ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. नव्या वर्षात 6 जानेवारी 2023ला सीरिजचे सगळे एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत. मात्र त्याआधी टीझरमधून श्रियाची पहिली झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली आहे. हेही वाचा - Pathan Controversy : दीपिकाच्या ‘भगव्या’ बिकिनीवरून वादाची ठिणगी; हिंदू महासभेचा इशारा, नेमकं प्रकरण काय
श्रियानं आतापर्यंत केलेल्या सीरिजवरती एक नजर टाकली तर गिल्टी माइंड्समध्ये तिनं एका वकिलाची भूमिका साकारली होती. तर द ब्रोकन न्यूजमध्ये एका न्यूज रिपोर्टरची भूमिका निभावली होती. या सगळ्या भूमिकांना छेद श्रिया आता एका सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नव्या वेब सीरिजसाठी तिच्या चाहत्यांकडून प्रेम आणि शुभेच्छा मिळत आहेत.
श्रिया काही दिवसांआधीच ऑस्ट्रेलिया ट्रिपला जाऊन आली. ऑस्ट्रेलियातील फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. तसंच तिथला तिचा अनुभव देखील ती शेअर करताना दिसली. श्रिया लहान असताना तिच्या आजोबांबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी ती ऑस्ट्रेलियाला गेली. श्रियानं सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वन्यजीवनाचा जवळून अनुभवलं. तसंच वूलिंगगोंगमध्ये स्कायडायव्हिंग अनुभवही घेतला.