मुंबई, 06 जून: झी मराठीवर अवधूत गुप्ते निर्देशित ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. प्रेक्षकांचा आवडता, जबरदस्त आणि अफलातून कार्यक्रम 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्यातील गुपितं उलगडली जातात. हा कार्यक्रम एकेकाळी चांगलाच गाजला होता. मोठमोठ्या अभिनेते, गायक, दिग्दर्शकांसोबतच राजकारण्यांनी देखील या शोला हजेरी लावली होती. आता हीच जादू प्रेक्षक पुन्हा अनुभवत आहेत. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता दुसऱ्या एपिसोडमध्ये मराठमोळा पुष्पा म्हणजेच श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. अभिनयासोबत श्रेयस उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्याने आपल्या टॅलेंटने इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. झी मराठीवरीलच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील त्याने साकारलेल्या यशवर्धन चौधरीच्या भूमिकेने त्याला नवी ओळख दिली. तसंच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी डबिंगमुळे तो चर्चेत आला. आता याच श्रेयसने ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली असून तो अवधूत गुप्तेच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे.
नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये श्रेयसनं त्याची एका ऑडिशनदरम्यानची आठवण सांगितली. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोनुसार श्रेयस म्हणतो, ‘मला एका सीरिअलच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं. तेव्हा मी बोलायला सुरुवात करणार तितक्यात कॅमेरामन म्हणाला, थांब. प्रॉब्लेम झाला आहे. अर्धा तास गेला तरी कॅमेरा काही केल्या सुरु होत नव्हता. तेव्हा तो कॅमेरामन मला म्हणाला ‘पनौती है ये’ असं श्रेयसने सांगितलं. Shahid-Mira Kapoor: बायकोच्या या सवयीमुळं वैतागलाय शाहिद कपूर; म्हणाला, ‘ती मला खूप त्रास…’ श्रेयस पुढे म्हणाला, ‘माहीत नाही, असेनही कदाचित. मी त्याला काहीच बोललो नाही. कारण त्यावेळी माझ्याकडे काहीच काम नव्हतं.’ ‘खुपते तिथे गुप्ते’चा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नव्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. आता खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये श्रेयस अजून कोणकोणते किस्से सांगणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.श्रेयस तळपदे स्पेशल हा भाग प्रेक्षकांना येत्या रविवारी म्हणजेच 11 जून रोजी पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लवकरच हजेरी लावणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. या सीझनमध्ये देखील कलाकार मंडळी आणि राजकारणी यांच्यामध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे.