मुंबई 12 मार्च : आपल्या सुरेख आवाजानं अनेकांना मंत्रमुग्ध करणारी हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा (Shreya Ghoshal Birthday) आज वाढदिवस आहे. श्रेयाच्या अनेक गाण्यांनी लाखोंची मनं जिंकली. आपल्या सुपरहीट गाण्यांनी श्रेयानं खूप कमी वयातच यशाचं शिखर गाठलं. तिनं आतापर्यंत तब्बल 200 हून अधिक चित्रपटांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या ओहियो राज्यात आजही 26 जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ (Shreya Ghoshal Day) म्हणून साजरा केला जातो. श्रेयानं गायनाचं सुरुवातीचं शिक्षण आपल्या आईकडून घेतलं. खूप लहान वयातच तिनं गाणं सुरू केलं. श्रेयाला खरी संधी मिळाली, ती ‘सारेगामापा’ या शोमधून. या शोनं श्रेयाच्या गायन करिअरला नवीन वळण दिलं. मात्र, खऱ्या अर्थानं श्रेयाच्या करिअरला तेव्हा सुरुवात झाली, जेव्हा तिला ‘सारेगामा’मध्ये दुसऱ्यांदा भाग घेण्याची संधी मिळाली. याच शोमधील आपल्या गायनानं श्रेयानं दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांचं लक्ष आकर्षित केलं आणि संजय लिला भन्साळी यांनी श्रेयाला आपल्या सिनेमात गाणं गाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. भन्साळी यांच्या सुपरहीट ठरलेल्या ‘देवदास’ (Devdas) या सिनेमात गाणं गाण्यासाठीचा प्रस्ताव भन्साळी यांनी श्रेयाच्या पुढे ठेवला. श्रेयानं इस्माइल दरबार यांच्या संगीत दिग्दर्शनात या सिनेमासाठी पाच गाणी गायली आणि ही गाणी सगळ्यांच्याच विशेष पसंतीस पडली. गायन श्रेत्रातील श्रेयाच्या पदार्पणाचं खरं श्रेय संजय लिला भन्साळी यांच्या आईला जातं. लिला भन्साळी यांनी श्रेयाला रिअॅलिटी शोमध्ये पाहिलं होतं आणि त्यांनीच संजय यांना सल्ला दिला होता. आईचं म्हणणं ऐकूनच भन्साळी यांनी श्रेयाला आपल्या देवदास या सिनेमासाठी गाणं गाण्याची संधी दिली. या सिनेमातील बैरी पिया हे गाणं सर्वांच्याच विशेष पसंतीत उतरलं. श्रेया घोषालनं हिंदीशिवाय बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी आणि भोजपूरी गाणीही गायली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.