Home /News /entertainment /

जया बच्चन यांची शिवसेनेनं केली जोरदार पाठराखण, कंगनाला पुन्हा एकदा फटकारले

जया बच्चन यांची शिवसेनेनं केली जोरदार पाठराखण, कंगनाला पुन्हा एकदा फटकारले

'बकवास करणाऱ्यांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे'

    मुंबई, 16 सप्टेंबर : 'सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, ' असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण करत कंगना राणावतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याची पाठराखण करण्यात आली आहे. हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही.  जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. ‘‘ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.’’ जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.' असं म्हणत सेनेनं पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला आहे. 'सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी बच्चन यांची बिजली कडाडली आहे. मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार घृणास्पद आहे.' 'सिनेसृष्टीतील यच्चयावत सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ हे जणू ‘ड्रग्ज’च्या जाळय़ात अडकले आहेत, चोवीस तास गांजा, चिलमीचे झुरके मारीत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱ्यांची ‘डोपिंग’ टेस्ट व्हायला हवी. कारण यापैकी बहुतेकांच्या बाबतीत खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.' असा टोलाही कंगनाला लगावला. दादासाहेब फाळके यांनी मोठ्या कष्टातून या साम्राज्याचे तोरण बांधले. राजा हरिश्चंद्र, मंदाकिनीसारख्या ‘मूकपटा’ने झालेली हिंदी सिनेसृष्टीची सुरुवात आजच्या शिखरापर्यंत पोहोचली ती अनेकांच्या कष्टांमुळेच. जो आपली हुनर व कला दाखवेल तोच येथे टिकेल. एक जमाना सैगल, देविका राणीचा होता. आजही अमिताभ बच्चन हे महानायकपदी अढळ आहेत. कधी त्या जागी राजेश खन्ना होते. धर्मेंद्र, जितेंद्र, देव आनंद, संपूर्ण कपूर खानदान, मा. भगवान, वैजयंती मालापासून हेमामालिनीपर्यंत आणि माधुरी दीक्षितपासून ऐश्वर्या रायपर्यंत एकापेक्षा एक सरस कलाकारांचे योगदान आहेच. पडद्याचे बॉक्स ऑफिस खुळखुळत ठेवायला आमिर, शाहरुख, सलमान अशा ‘खान’ मंडळींची मदत झालीच आहे. हे सर्व लोक फक्त गटारातच लोळत होते व ड्रग्ज घेत होते असा दावा कोणी करत असेल तर बकवास करणाऱ्यांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे.'असा सणसणीत टोलाही लगावण्यात आला. 'अनेक कलाकार संकटसमयी खिशात हात घालून मदत करीत असतात. राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटात सामाजिक दृष्टिकोन, समाजवाद याची ठिणगी दिसत होतीच. आमिर खानचे चित्रपटही आज त्याच चौकटीचे आहेत. हे सर्व लोक नशेत धूत होऊन हे राष्ट्रीय कार्य करीत आहेत. अशा गुळण्या टाकणे हा देशाचाच अवमान आहे.' असंही या लेखात म्हटलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Kangana ranaut, Samana, Sanjay raut, Shivsena, संजय राऊत

    पुढील बातम्या