मुंबई, 19 मार्च- गायक सिद्धू मुसेवालानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आल्याने सर्वानांच धक्का बसला होता. त्यामुळं सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. दरम्यान आता लॉरेन्स बिष्णोई गॅंगनं सलमान खानला मेल केल्याचे समोर आलं आहे. सलमानच्या टीमनं बांद्रा पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस सध्या या मेलची तपासणी करत आहे. नेमकं या मेलमध्ये काय आहे, याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. काही दिवासापूर्वी लॉरेन्स बिष्णोईने ‘एबीपी माझा’ ला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले होते. या मुलाखतीत लॉरेन्स बिष्णोईने सांगितलं होतं की, ‘आमच्या संपूर्ण समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. तो नेहमी आमच्या समाजाला कमी लेखतो. माझ्या समाजात प्राणी आणि झाडांचा जीव घेण्यास सक्त मनाई आहे. त्यांना आम्ही कधीही ईजा पोहोचवत नाही. मात्र सलमान खानने आमच्या इथे येत काळवीटाची शिकार केली होती. सलमान खानवर केस सुरु असूनही त्याने अजून आमच्या समाजाची माफी मागितलेली नसल्याचे तो या मुलाखतीत म्हणाला होता. वाचा- भर पार्टीत राज कपूर यांनी राज कुमार यांना म्हटलं खुनी, मग जे घडलं.. लॉरेन्स बिष्णोई पुढे म्हणाला होता की, ‘मी लहान असल्यापासून त्याच्यावर माझा प्रचंड राग आहे. मला त्याचा घमंड मोडायचा आहे. त्याने आमच्या लोकांना पैशांचा आमिष दिला होता. सलमान खानने आमच्या मंदिरात येऊन माफी मागायला हवी. माझ्या समाजाने त्याला माफ केल्यास, माझा त्याच्याशी काहीही संबंध राहणार नाही.कोणत्याही लोकप्रियतेसाठी नाही ठोस कारणामुळे आम्ही त्याला मारणार आहोत’.. असा खळबळजनक दावा लॉरेन्सने यावेळी केला होता. या सगळ्या प्रकारानंतर त्याच्या गॅंगनं आता सलमान खानला मेल केल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाबी गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाची गेल्यावर्षी गोळ्या झाडून निर्घुर्ण हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली होती. यानंतर सलमान खानला धमकीचं पत्र देखील आलं होतं. यामुळं अभिनेत्याच्या सुरक्षेतेमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. प्रकरण कुठं शांत होतय ना होतय तर याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे.