मुंबई, 9 जुलै : वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दुसऱ्या सीझनचं शूटिंग पूर्ण झालं असून हा सीझन लवकरच रिलीज होणार आहे. नुकताच या Sacred Games 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून प्रेक्षकांच्या मनात या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी खूप उत्सुकता होती. अनेकदा त्याच्य़ा रिलीजची तारिखही बदलण्यात आली होती मात्र आता याची प्रतिक्षा संपली आहे. या वेब सीरिजचा दुसरा सीझन येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटला येणार असल्याचं नेटफ्लिक्सच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून सांगण्यात आलं आहे.
सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात गणेश गायतोंडे (नवाझुद्दीन सिद्दीकी) मेलेला दाखवण्यात आला होता. त्यामुळे सरताज सिंहला संकट टळलं असं वाटत होतं. मात्र सीझन 2 च्या ट्रेलरमध्ये मात्र तो परत आलेला दाखवण्यात आला आहे. तो सरताजला एक मेसेज पाठवतो, ज्यात लिहिलेलं असतं की युद्धाची वेळ आली आहे. मात्र हा मेसेज पाठवणारा कोण आहे हे मात्र कोणालाच माहित नसतं. त्यामुळे सरताज या संकटाचा सामना करायला तयार असतो मात्र त्याचा शत्रू कोण आहे हे मात्र त्याला माहीत नसतं. दमदार संवाद आणि नवाझुद्दीनचा तेवढ्याच ताकदीचा अभिनय या ट्रेलरमध्ये पहायला मिळतो.
सेक्रेड गेम्सच्या या सीझनमध्ये गणेश गायतोंडे म्हणजेच नवाझुद्दीनच्या लुकची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या सीझनचे फोस्टर रिलीज झाले होते. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सूटमध्ये दिसला होता. नवाजुद्दीननं, 'पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात...' असं कॅप्शन त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट दिलं होतं. त्यामुळे यावेळी या सीझनमध्ये मोठा धमाका होणार हे निश्चित. अशातच गायतोंडेनं सरताजचं आयुष्य उद्धवस्त करून टाकण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे या नव्या सीझन नक्की काय काय घडणार, सरताज गायतोंडेचा सामना करू शकेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येत्या 15 ऑगस्टला मिळणार आहेत.
सेक्रेड गेम्स सीझन 2 मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी यांची नव्यानं एंट्री होत आहे. यातील नवाजुद्दीनच्या सीन्सचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं तर सैफ अली खान उर्फ सरताज सिंहच्या सीन्सचं दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केलं आहे. हा सीझन 15 ऑगस्टला रिलीज होत असला तरीही याच दिवशी बॉलिवूडचे तीन बिग बजेच आणि सुपर स्टारर सिनेमे रिलीज होणार आहेत आणि यात आता सेक्रेड गेम्स सीझन 2ची भर पडली आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये वेगळीच चुरस पाहायला मिळाणार आहे.