मुंबई, 20 जानेवारी: ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली. नवाजुद्दीन सिद्दीकी, राजश्री देशपांडे या कलाकारांच्या या सिरीजमध्ये मुख्य भूमिका होत्या. या सीरिजमधील प्रत्येकच कलाकाराने दमदार भूमिका साकारल्या. त्यापैकी एक भूमिका म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैतची भूमिका. कुब्राने सीरिजमध्ये कुक्कूची भूमिका साकारली होती. ही भूमिका एका तृतियपंथी स्त्रीची होती, पण सर्वात प्रथम ती सलमान खानच्या एका चित्रपटात दिसली होती. त्या अनुभवाबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री कुब्रा सैत तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावेळी तिने बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानवर नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. सलमान खान आणि कुब्रा सैत यांनी २०११ मध्ये रेडी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने मोलकरणीची भूमिका साकारली होती. याविषयी सांगताना ती म्हणाली की, ‘सलमान खान अनेकदा शूटसाठी उशीरा यायचा. जिथे संपूर्ण टीम आणि क्रू सकाळी पोहोचले होते, तेव्हा तो दुपारी 2.45 वाजता आला. सगळी टीम त्याची वाट पाहत बसली होती.’ हेही वाचा - Neena Gupta: ‘मी तर सार्वजनिक…’ चाहत्याच्या ‘त्या’ कृतीवर भडकल्या नीना गुप्ता; व्हिडीओ व्हायरल कुब्बरा सैतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी पहाटे 5.30 वाजता हॉटेलमधून निघायची. ती म्हणाली कि, ‘मला सकाळी ब्रेकफास्टला तेव्हा फक्त सफरचंदच देत असे, मी पुन्हा ब्रेकफास्टची मागणी केली, ते पुन्हा मला सफरचंदच देत असत. शूटिंग पहिले १० ला सुरू होईल असं सांगण्यात आलं, मग दहाचे अकरा झाले, अकराचे बारा झाले.
पुढे ती म्हणाली, ‘नंतर पावणे तीनच्या सुमारास सेटवर थोडी लगबग दिसू लागली, कुणीतरी महत्त्वाची व्यक्ती येणार होती, ती म्हणजे चित्रपटाचा हीरो म्हणजेच खुद्द सलमान खान. आम्ही एका गोल्फ कोर्सच्या सीनचं शूटिंग करत होतो. सलमान खान आरामशीर पावणे तीन वाजता आला आणि म्हणाला, आपण लंच ब्रेक घेऊया का?’ त्यावेळी सलमानचे हे वागणं पाहून कुब्रा चांगलीच चकित झाली होती, कारण तिने सकाळपासून केवळ 2 सफरचंदच खाल्ली होती.
या गोष्टीतूनही काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असं कुब्राने मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाली, ‘मी यातूनही काहीतरी चांगलंच शिकून घेतलं. सलमान खान सेटवर प्रत्येक सहकलाकाराला बोलावून एकत्रच त्यांच्याबरोबर जेवत असे. ही गोष्ट नक्कीच त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.’