मुंबई, 13 एप्रिल : देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मालिकांंचं शूटिंग रद्द करण्यात आले आहे. परिणामी काही जुन्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. रामानंद सागर कृत 'रामायण' ही मालिका विशेष स्वारस्याने पाहिली जात आहे. यामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार काय करतो, आता त्याचं आयुष्य काय आहे याचा शोध सोशल मीडिया तसंच विविध माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर काही मीम्सही बनत आहेत. सोशल मीडियावर सध्या रामायणध्ये विविध भूमिका साकारणारे असलम खान यांच्यावर देखील खूप मीम्स बनत आहेत. सध्या पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आलेले असलम काही वर्षांपूर्वी काम मिळत नसल्यामुळे त्यांच्या गावी परतले होते.
(हे वाचा-लॉकाडाऊनमध्ये अशी शिक्षा पहिल्यांदाच, घरातून बाहेर पडलात तर पोलीस ऐकवणार 'हे' गा)
असलम खान यांनी रामायण या मालिकेत विविध भूमिका केल्या आहेत. कधी ते राजघराण्यातील मंत्री म्हणून दिसत तर कधी समुद्र देव म्हणून प्रकट होत. रामाची भूमिका करणाऱ्या अरूण गोविल यांच्या बॉडी डबलचं काम देखील असलम यांनी पार पाडलं आहे. असं म्हणतात की रामायणामध्ये सर्वाधिक भूमिका असलम यांच्या वाट्याला आल्या होत्या.
(हे वाचा-भारतात कोरोनापासून वाचलेल्या पहिल्या व्यक्तीला कार्तिकने विचारले थेट प्रश्न)
असलम खान उत्तर प्रदेशातील झाशी याठिकाणीचे रहिवासी होते. मालिकांमध्ये काम करण्याआधी ते अकाउंटंट म्हणून काम पाहायचे मात्र अभिनय करण्याची त्यांनी खूप इच्छा होती. त्यानंतर त्यांनी आधी विक्रम-वेताळ मध्ये काम केलं आणि मग रामायणमध्ये विविध भूमिका साकारल्या. सध्या त्यांच्यावर बनणारे मीम्स आणि सोशल मीडियावर मिळणारी प्रसिद्धी यामुळे ते भारावून गेले आहेत. याबाबत त्यांनी मुलाखत देखील दिली आहे. रामायणानंतर त्यांना अभिनय क्षेत्रात काम मिळणं बंद झालं. 2002 मध्ये त्यांनी अभिनयामध्ये शेवटचं काम केलं होत. त्यानंतर त्यांच्या गावी परतले. आता ते लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांना काम मिळायला हवं होतं अशी खंत असलम खान यांनी व्यक्त केली आहे.
संपादन- जान्हवी भाटकर