मुंबई 21 सप्टेंबर : कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव यांची अनेक दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले होते, ज्यानंतर त्यांच्यावर तब्बल 41 दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर 21 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण जगाला पोट धरुन हसायला लावणारे राजू श्रीवास्तव आज सगळ्यांना रडवून गेले. पण या सगळ्यांना हसायला लावणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्याचा प्रवास फारच खडतर होता. एका ऑटोचालकापासून ते अगदी कॉमेडी बादशाहपर्यंतचा त्यांचा प्रवास, चला जाणून घेऊ. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेले 58 वर्षीय राजू श्रीवास्तव मनात दृढ निश्चय आणि डोळ्यात अनेक स्वप्ने घेऊन मुंबईला आले. स्वप्नांच्या या शहरात येणं, राजू श्रीवास्तवसाठी सोपी गोष्ट नव्हती. काही दिवसांनी जेव्हा राजू श्रीवास्तव यांना पैशांची कमतरता भासू लागली तेव्हा ते त्यांच्या गरजा भागवण्यासाठी ऑटोचालक बनले. मात्र, या काळातही ते स्टँड-अप कॉमेडी करत राहिला. हे वाचा : Comedian Raju Srivastava Dies: कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा खरंतर भारतात स्टँड अप कॉमेडीचा जन्म स्पष्टपणे राजू श्रीवास्तव यांच्यापासून सुरु झाला. ज्यामध्ये ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा एखादा गंभीर विषय कॉमेडीच्या माध्यमातून मांडत असंत. वडिल कवी असल्याने विनोदाची कला राजू श्रीवास्तव यांच्यात पहिल्यापासूनच होती. अशा परिस्थितीत राजू श्रीवास्तव विनोदी अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सर्व संकटांना तोंड देत पुढे जात राहिले. मग एके दिवशी ऑटो चालवताना राजू श्रीवास्तवचे नशीब चमकले आणि त्यांना कॉमेडी शोसाठी ब्रेक मिळाला. यानंतर राजू श्रीवास्तव यांनी मागे वळून पाहिले नाही. राजू यांनी डीडी नॅशनलच्या प्रसिद्ध शो टी टाइम मनोरंजनापासून ते द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजपर्यंत आपली खास ओळख निर्माण केली. हे वाचा : Raju Srivastava Net Worth: लग्झरी कार अन् करोडोंच्या घरांचे मालक होते राजू श्रीवास्तव; होती इतकी संपत्ती राजू श्रीवास्तव द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये उपविजेता होते आणि या शोमध्ये त्यांनी त्यांचा गजोधर भैय्या अवतार दाखवला, जो लोकांना खूप आवडला होता. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले होते. मुंबईत आल्यावर त्या वेळी कॉमेडियनकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. फक्त जॉनी लिव्हर साहेब असे होते, ज्यांना पाहून आम्हाला धीर यायचा. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी खूप चढ-उतार पाहिले. इतकंच नाही तर कॉमेडी शो करण्यासाठी मला फक्त 50 रुपये मिळायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.