मुंबई: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या ४१ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून आज अखेर राजू श्रीवास्तव यांची प्राण ज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं होतं. आज त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यानं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे . कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूपश्यात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. ब्रेन डॅमेज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना उपचारांती व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हेही वाचा - Raju Srivastava Net Worth: लग्झरी कार अन् करोडोंच्या घरांचे मालक होते राजू श्रीवास्तव; होती इतकी संपत्ती राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचं होतं. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली.राजू श्रीवास्तव संपूर्ण जगभर कॉमेडी शो केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ऑडिओ व्हिडीओ सीरिजही काढली होती. आजवर त्यांनी अनेक जाहिरातीतही काम केलं. राजू श्रीवास्तव यांनी 1993मध्ये लग्न केलं. शिखा श्रीवास्तव असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.
नुकतंच आकाशवाणी मुंबईने याबाबतचं एक ट्विट शेअर केलं आहे. दरम्यान एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.20 वाजता राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, खासदार रवी किशन यांच्यासह अनेक राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. राजू श्रीवास्तव यांनी कानपूरसारख्या शहरातून बाहेर पडून बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. त्यांना स्टँडअप कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.