मुंबई, 12 जून : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या बालपणीचे अनेक किस्से त्यांच्या चाहत्यांशी शेअर करताना दिसतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील अशाप्रकारच्या चटपटीत आणि कधीही न ऐकलेली गुपितं जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. असाच एक आपल्या बालपणीचा किस्सा ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं सुद्धा 2017मध्ये कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये शेअर केला होता. प्रियांका लहान असताना एकदा एका माकडानं तिच्या कानाखाली मारल्याचा एक विनोदी किस्सा प्रियांकानं यावेळी शेअर केला.
कपिल शर्माच्या शोमध्ये प्रियांकानं तिच्या बालपणीचा हा मजेदार किस्सा शेअर केला. प्रियांका म्हणाली, ‘मी त्यावेळी लखनऊमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकत होते. माझ्या शाळेच्या जवळ एक झाड होतं ज्यावर खूप माकड येत असत. एक माकड झाडावर बसून स्वतःला साफ करत होतं मला ते पाहून खूप विनोदी वाटलं आणि तिला पाहून जोरजोरात हसू लागले. हे त्या माकडानं पाहिलं, ते खाली आलं, पुन्हा एकदा त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या कानाखाली मारली आणि पुन्हा झाडावर जाऊन बसलं.’ हा किस्सा ऐकल्यावर मात्र प्रेक्षकांना हसू आवरता आलं नाही.
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राला चक्क एका माकडाकडून मार खावा लागला होता. मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली प्रियांका लवकरच द स्काय इज पिंक या सिनेमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. याआधी भारत सिनेमा सोडल्यानं मागच्या काही दिवसांपासून प्रियांका सलमान खानच्या निशाण्यावर आहे. या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये त्यानं प्रियांकाला टोमणा मारायची एकही संधी सोडली नाही.
सध्या प्रियांका मुंबईमध्ये असून नुकतंच तिनं तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमात प्रियांका सोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस करत आहे.