बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट नुकतेच हॅक करण्यात आलं होतं. हे अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. काही वेळापूर्वी हे अकाउंट रिकव्हर करण्यात आलं. पण बॉलिवूड सेलिब्रिटींच अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही याअगोदरही काही बॉलिवूड कलाकारांची ट्विटर अकाउंट हॅक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
2018 मध्ये अभिनेता अनुपम खेर यांच ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. त्यावेळी अनुपम खेर अमेरिकेत होते आणि त्यांचं अकाउंट हॅक झाल्याचं त्यांना त्यांच्या एक मित्राकडून समजलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार याच्यामागे टर्किश सायबर आर्मीचा हात होता आणि अमिताभ यांच्या प्रमाणेच हॅकींग नंतर अनुपम यांच्याही अकाउंटवर आय लव्ह पाकिस्तान असं लिहिण्यात आलं होतं.
अमिताभ यांच्याअगोदर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचं सुद्धा ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. फेब्रुवारी 2018ला अभिषेकचं अकाउंट हॅक झालं होतं आणि त्यानंतर त्या अकाउंटवरुन एका मागोमाग एक खूप सारे ट्वीट करण्यात आले होते. तसेच त्याच्या अकाउंटचा व्हेरीफाइडचा बॅच सुद्धा हटवण्यात आला होता. पण काही काळानं त्याचं अकाउंट रिकव्हर करण्यात आलं.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं ट्विटर अकाउंटही एकदा हॅक झालेलं आहे. तिचं आकाउंट हॅक करून त्यावरून आक्षेपार्ह मजकूर ट्वीट करण्यात आला होता. त्यानंतर उर्वशीनं सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती.
अभिनेता ऋषी कपूर यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. विचित्र मेसेज यायला लागल्यावर त्यांना त्यांचं अकाउंट हॅक झाल्याचं समजलं होतं. त्यानंतर काही काळानं त्यांचं अकाउंट रिकव्हर करण्यात आलं. सध्या ऋषी कपूर अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत आहेत.
सध्या आगामी सिनेमा कबीर सिंहमुळे चर्चेत असलेला अभिनेता शाहिद कपूर याचंही ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या अकाउंटवरुन आय लव्ह कतरिना कैफ असं ट्वीटही करण्यात आलं होतं. पण नंतर ते अकाउंट रिकव्हर करण्यात आलं.