मुंबई, 05 जून: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा 80 च्या दशकात तिच्या सौंदर्य, अभिनय याचसोबत वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत राहायची. तिचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. रेखाचं बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत वाद होते. नंतर ते भांडण इतके वाढले की त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं आणि एकमेकांचे तोंड पाहणंही सोडले. कोण होत्या त्या अभिनेत्री आणि काय होतं त्यांच्या भांडणांमागचं कारण जाणून घ्या. बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र अमिताभ बच्चनसोबतची तिची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेत होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले होते. अभिनेत्री जयासोबत तो वैवाहिक जीवन जगत होता. जेव्हा रेखा-अमिताभच्या अफेअरच्या अफवा समोर आल्या, तेव्हा जया आणि रेखा यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा जया बच्चन अमिताभला न सांगता सेटवर पोहोचल्या आणि तिथे त्यांनी रेखाला कोपऱ्यात अमिताभ बच्चनशी बोलताना पाहिलं. जया बच्चन यांना हे सहन झालं नाही आणि तेव्हाच दोघींमध्ये खूप भांडण झालं. तेव्हा सेटवरील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर रेखा आणि जया यांच्या मैत्रीत फूट पडली.
जयाशिवाय रेखाचे संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांच्यासोबतही भांडण झाले होते. रेखा 1984 मध्ये संजय दत्तसोबत ‘जमीन आसमान’ या चित्रपटाचे शूटिंग करत असताना हा प्रसंग घडला होता. रेखा आणि संजय दत्त यांच्या अफेअरच्या चर्चा त्या काळात रंगल्या होत्या. मात्र, रेखाने तिच्या अफेअरच्या बातम्यांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही आणि संजय दत्तनेही या बातम्यांवर मौन सोडले नाही. पण संजयच्या आईने एके दिवशी रेखाला यावरून चांगलंच सुनावलं होतं. जे कळल्यानंतर संजय दत्त आणि त्याचे वडील सुनील दत्त यांनाही धक्का बसला होता. Rekha Life Story: 6 अफेअर्स, 2 लग्नं आणि ‘त्या’ गर्लफ्रेंडसोबतचं नातं; कायम चर्चेत राहिलं रेखाचं आयुष्य रेखा आणि संजयच्या जवळीकतेमुळे नर्गिस दत्त खूपच नाराज झाल्या होत्या. एकदा रागाच्या भरात त्यांनी रेखाला डायनही म्हटले होते. यासोबतच रेखाच्या चारित्र्यावरही अनेक आरोप केले होते. 1976 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिसने रेखावर निशाणा साधला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नर्गिसने त्या मुलाखतीत सांगितले होते की, रेखा पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवते. काही लोकांच्या नजरेत ती डायनपेक्षा कमी नाही. मौसमी चॅटर्जी आणि रेखामध्येही जोरदार भांडण झालं होतं. ‘भोला-भाला’ चित्रपटात दोघींची पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात वाद झाले. खरं तर, जेव्हा ‘भोला-भला’चे पोस्टर प्रकाशित झाले, तेव्हा त्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी तिच्या नावात मौसमीपूर्वी रेखाचे नाव लिहिले होते. इतकंच काय, मौसमीला या गोष्टी आवडल्या नाहीत आणि तिने आपला सगळा राग मीडियासमोर काढला.