मुंबई 28 मार्च : आतापर्यंत अनेक परदेशी कलाकारांनी भारतात येऊन बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं नशीब आजमवलं आहे. यामध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif), नोरा फतेही(Nora Fatehi), फवाद खान अशा अनेक कलाकारांचा समावेश होतो. यामध्ये आणखी एका नावाचा प्रामुख्यानं उल्लेख होणं गरजेचं आहे. हे नाव आहे अमेरिकन अभिनेत्री नर्गिस फाखरीचं (Nargis Fakhri). 2011मध्ये 'रॉकस्टार' (Rockstar) चित्रपटातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं 'मद्रास कॅफे' आणि 'मैं तेरा हीरो' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. यामध्ये 'स्पाय' या हॉलिवूडपटाचाही सामवेश आहे. मात्र, 2017 नंतर या अभिनेत्रीनं अचानक ब्रेक घेऊन तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. याबाबत तिनं गेली पाच वर्ष मौन बाळगलं होतं. पण, आता तिनं तिच्या ब्रेक घेण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नर्गिस फाखरीनं ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं. 2016-17 या वर्षामध्ये खूप जास्त काम केलं. 2016 मध्ये तिनं अझहर, हाउसफुल 3, बँजो, ढिशूम आणि सागसम या पाच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. शिवाय याच काळात ती तणावाखालीदेखील (Stress) होती. तिला आनंद देणाऱ्या गोष्टींपासून ती दूर जात असल्याचं तिच्या लक्षात आलं. बॅक-टू-बॅक फिल्म्स केल्यामुळे शरीर आणि मनावर ताण आला. आपलं मन (Mind) आणि शरीरात (Body) संतुलन निर्माण करण्यासाठी तिनं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
VIDEO: '...तिचे पंख कापू नका'; हिजाब वादावर मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने मांडली स्पष्ट भूमिका
ई-टाइम्सला दिलेल्या या मुलाखतीत नर्गिस म्हणाली, 'मला जाणवलं की मी जास्त काम करत आहे आणि तणावाखाली आहे. मला माझ्या कुटुंबाची आणि मित्रांची आठवण येते. 2016-2017 या काळात मला याची प्रकर्षानं जाणीव झाली. ज्यातून मला आनंद मिळतो असं काम मी करतच नाही, हे माझ्या लक्षात आलं. मी बॅक-टू-बॅक चित्रपट केले. आयुष्यात प्रचंड गोंधळ सुरू होता. माझं मन आणि शरीर संतुलित करण्यासाठी मला ब्रेक घेण्याची गरज वाटली आणि तेव्हाच मी हे पाऊल उचललं.' मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) ब्रेक घेणं अतिशय गरजेचं आहे. ब्रेक घेतल्यास पुनरागमन करणं अवघड होईल, अशी भीती अनेक सेलिब्रिटींना असते. मी याबाबत विचार केला नव्हता, असंही नर्गिस म्हणाली.
बिग बॉसच्या घरातला 'हा' स्पर्धक कंगनाच्या जेलमध्ये! Lock Upp मध्ये नेमकं चाललंय काय?
नर्गिस पुढे म्हणाली की, 'कधीकधी तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ब्रेक घेणं महत्त्वाचं असते. मला माहीत आहे, इंडस्ट्रीतील कलाकार, त्यांचे मॅनेजर आणि अगदी पीआर एजन्सीसुद्धा तुम्हाला जास्त अॅक्टिव्ह राहण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही जास्त वेळ ब्रेक घेतला तर लोक तुम्हाला विसरतील, असं सांगितलं जातं. जी गोष्ट मिळवण्यासाठी अतोनात कष्ट केले आहेत ती गमावण्याची कलाकारांच्या मनात भीती असते. असं वाटणं साहजिकही आहे. पण, माझा दृष्टिकोन वेगळा आहे. मला असं वाटतं, जेव्हा तुम्ही स्वत:साठी, स्वत:ची काळजी घेण्यासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी वेळ घेता तेव्हा तुम्ही कधीही पराभूत होत नाही. उलट तेव्हा तर तुम्हाला खऱ्या अर्थानं विजय मिळतो, असं मी मानते.'
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या नर्गिसच्या चाहत्यांना आता तिच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News