मुंबई, 22 ऑक्टोबर : मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘सैराट’च्या माध्यमातून सर्वांनाच झिंगाट केलं आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती सुपरहिट ठरते. सैराटने तर चित्रपटसृष्टीत नवीन विक्रम केला. त्यानंतर या अस्सल मराठी दिग्दर्शकाने अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला. प्रत्येक चित्रपटाप्रमाणे याच्यावरसुद्धा कौतुकाचा वर्षाव झाला. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिणात्य कलाकारांनी या चित्रपटाचं कौतूक केलं. एकूणच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. झुंड नंतर आता नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक नवीन कलाकृती आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता नागराज मंजुळे पुन्हा एक आगळावेगळा प्रयोग आपल्यासाठी घेऊन येत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर नागराज यांनी विविध चित्रपट तसेच वेब सिरींजची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं एका चित्रपटाचं नाव असून त्याचं पोस्टर समोर आलं आहे. या चित्रपटाचा टीझर येत्या 25 ऑक्टोबरला येत आहे. याबरोबरच या चित्रपटाचा पोस्टरदेखील शेअर केलं असून हा चित्रपट मराठी, हिंदीसह इतर २ दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. हेही वाचा - KBC 14: स्पर्धकाला देता आलं नाही शिक्षक दिनाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर; 50 लाखांवर सोडलं पाणी नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली असून हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याबरोबरच या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचं असून २५ तारखेला याचा टीझर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार याची खूप उत्सुकता आहे.
नागराज मंजुळे यांनी दिवाळीनिमित्त चाहत्यांना अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे आटपाट आणि झी स्टुडिओ निर्मित विक्रम पटवर्धन दिग्दर्शित “फ्रेम” या चित्रपटाची निवड 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. “फ्रेम"च्या नावानं चांगभलं !’ असं म्हणत त्यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
विक्रम पटवर्धन हे प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन यांचे भाऊ आहेत. नागराज मंजुळेंच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच असणार आहे. या तिन्ही कल्कावृत्ती पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.