मुंबई, 14 जानेवारी: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिकादेखील नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वेगळा विषय असलेली ही मालिका प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेमधून अभिनेता किरण माने यांना तडकाफडकी काढून टाकल्यावर मालिकेवरून वादंग उठला. त्यानंतर दुसऱ्या कलाकाराने किरण मानेची जागा घेतली. आता ही मालिका बंद होणार आहे. आज म्हणजेच शनिवारी ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. यावेळी मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या शौनकने एक भावुक पोस्ट केली आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने जवळजवळ सातशे भाग पूर्ण केले. बराच काळ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मालिकेचं कथानक अनेकदा बदललं. नुकतंच मालिकेत ५ वर्षांचा लीप देखील दाखवण्यात आला होता. पण त्यानंतर मालिकेचा टीआरपी चांगलाच घसरला. एवढ्या वर्षात अनेक वेळा ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र ही मालिका कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिली. आज मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हेही वाचा - अखेर अनिरुद्धचा डाव साध्य होणार; अरुंधती आणि आशुतोष समोर उभं राहणार अनुष्का नावाचं संकट आता मालिकेतील शौनक म्हणजेच अभिनेता योगेश सोहोनीने एक इमोशनल पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये अनेक फोटोंसोबत एवढ्या वर्षातील अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्याने लिहिलंय कि, ‘आज “मुलगी झाली हो” या मालिकेचा शेवटच्या भागा प्रदर्शित झाला, ७०० हुन अधिक भागांचा हा अविस्मरणीय प्रवास थांबला. थांबला म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल, कारण जे कुठेतरी थांबलय ते कुठेतरी नव्याने सुरू होणार आहे.’’
‘‘आज हे लिहिताना शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी, घटना, किस्से, प्रसंग, डोळयांसमोर आले. हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी आल्या, अप्रिय घटना घडल्या, न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले त्याचबरोबर असंख्य चांगली, प्रेमळ माणसे (कलाकार) भेटले, आणि ते आयुष्याचा एक भाग होऊन गेले. शौनक ही व्यक्तिरेखा साकारताना मला या घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा, भेटलेल्या माणसांचा, त्यांच्या आलेल्या अनुभवाचा खूप फायदा झाला. लवकरच एका वेगळ्या मालिकेत, वेगळ्या भूमिकेत भेटू तोपर्यंत पुनरागमनायच……’’
योगेशनं या मालिकेत साकारलेली शौनक ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. योगेशच्या या पोस्टनं मालिकेच्या चाहत्यांना देखील भावुक केलं आहे. त्यांनी या पोस्टखाली कमेंट्स करत त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.