मुंबई 8 जुलै: अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) तिच्या नाविन्यपूर्ण कलाकृतींसाठी ओळखली जाते. नेमहीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी मुक्ता आता अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सोबत एका नव्याकोऱ्या मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi marathi movie) असं या चित्रपटाचं नाव असून त्याची रिलीज डेट नुकतीच समोर आली आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे श्रेयस तळपदेसह नंदू माधव, संदीप पाठक, खुशी हजारे आणि नवीन प्रभाकर अशी दमदार स्टारकास्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मुक्ता आणि श्रेयस आणि अनोखी जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट एका छोट्याश्या व्हिडिओमार्फत शेअर करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 7 ऑक्टोबरला प्रेक्षागृहात पाहायला (Aapdi Thaapdi marathi movie release date) मिळणार आहे. ‘फॅमिलीचा पिक्चर बघा फॅमिली बरोबर’ अशी खास टॅगलाईन सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हे ही वाचा- बघू, पांडुरंग कधी संधी देतो! स्वप्नील जोशीचं विठू माऊलीला साकडं मुक्ता ही तिच्या अभिनयातील वैविध्यासाठी ओळखली जाते. आपडी थापडी सिनेमाच्या निमित्ताने एका हलक्या फुलक्या विषयावरचा सिनेमा ती घेऊन येत असल्याचं सिनेमाची पहिली झलक पाहून समजत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी तिला कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सिनेमाच्या या अनोख्या पोस्टरमुळे अनेकांची उत्सुकता ताणली गेल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. मुक्ताने आपडी थापडी सिनेमाचं चित्रीकरण करताना काही खास व्हिडिओ सुद्धा शेअर केले होते ज्यामध्ये सिनेमातील कलाकार धमाल करताना पाहायला मिळाले होते. एकूणच सिनेमाची झलक पाहून कुटुंबातील सर्वांनी आवर्जून पाहावी अशी सुंदर कलाकृती असणार आहे असं दिसून येत आहे. मुक्ता बर्वे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना कायम दिसून येते. कधी मालिका तर कधी ऑडिओ बुक अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ती काम करताना दिसते. सध्या मुक्ता Y या सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एका ज्वलंत विषयावर आधारित Y हा सिनेमा चित्रपटगृहात गाजताना दिसत आहे. स्त्रीभ्रूण हत्या हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय थरार पद्धतीने मांडण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाल्याचं अनेक रिव्ह्यूमधून समोर येत आहे. या सिनेमाचा विषय अगदी भावणारा तसंच एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडणारा आहे असं मत अनेक ठिकाणहून व्यक्त केलं जात आहे. मुक्ताने स्वतः सिनेमाबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया तिच्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांनी हा सिनेमा बघून आपली प्रतिक्रिया दिल्याचं दिसून येत आहे.