मुंबई, 08 जुलै: पंढरपूरची आषाढी वारी ( Pandharpur Ashadhi WarI 2022) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी वारी जवळ येताच वारकऱ्यांची पाऊलं पंढरीच्या दिशेने रवाना होतात. लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपूरात दाखल झाले आहेत. अनेक कलाकारांनी ही मागच्या काही दिवसात वारीत सहभाग घेत पंढरपूरच्या विठूरायाचं दर्शन घेतलं. अभिनेता स्वप्निल जोशीनं ( Swapnil Joshi) देखील पायी वारीचा अनुभव घेत विठू माऊलीच्या चरणी साकडं घातलं. वाखरी ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास केल्यानंतर स्वप्निल जोशीनं पोस्ट शेअर करत त्याला आलेला अद्भूत अनुभव शेअर केलाय. खरंतर स्वप्निल जोशीला अनेक वर्षांपासून वारीचा अनुभव घ्यायचा होता मात्र त्याचं स्वप्न यंदा अखेर पूर्ण झालं. स्वप्निलला पांडुरंग कसा भेटला याचा अनुभव त्यानं सगळ्यांबरोबर शेअर केला. त्यानं म्हटलंय, ‘काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो, असं म्हणत संपूर्ण वारी पायी करण्याची संधी दे असं साकडं स्वप्निलनं माऊलींना घातलं. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही’.
हेही वाचा - दाट धुके, काळे ढग, हिरवागार परिसर; प्राजक्ता गायकवाडनं अनवाणी फिरत केली गडाची सैर स्वप्निलनं पुढे म्हटलंय, ‘आम्ही picture मधले hero! पण खरे हिरो हे वारकरी! वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पाई वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते, त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं’. पोस्टच्या शेवटी स्वप्निल भावूक होत म्हणाला, ‘लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत. हा “प्रवास” प्रत्येकाने एकदा तरी करावाच. माझी आजी म्हणायची…“तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !” काल मला कळलं ती काय म्हणायची. आषाढी एकादशीच्या निमित्तानं, स्वप्निल जोशीच्या संपूर्म टीमनं वारीतील सर्व वारकऱ्यांना अन्नदान केलं. त्यांच्या बसण्याची सोय, पाण्याची सोय, पत्राशेड, स्टाल्स लावले होते. स्वप्निलनं पायी वारी करताना त्याच्या संपूर्ण टीमचं काम पाहिलं. ‘मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा अभिमान वाटत’ असल्याचं स्वप्निलनं यावेळी म्हटलं.