Home /News /entertainment /

EXCLUSIVE: लग्नाशिवाय आयुष्य नाही, असं काही नसतं : मुक्ता बर्वे

EXCLUSIVE: लग्नाशिवाय आयुष्य नाही, असं काही नसतं : मुक्ता बर्वे

'अजूनही बरसात आहे' या नव्या मालिकेतली मीरा आणि मुक्ता यांचे विचार बरेचसे सारखे, अगदी काही आवडीनिवडीही. कशा ते वाचा मुक्ताच्याच शब्दांत...

  सोनाली देशपांडे मुंबई, 28 जुलै: सध्या अनेकांच्या गप्पात एक विषय हमखास असतो. तो म्हणजे ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतली मीरा. मीराचं तडफदार, हजरजबाबी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच आवडतंय. मीरा साकारणाऱ्या मुक्ता बर्वे जवळजवळ ८ वर्षांनी मालिकेत दिसतेय. त्याबद्दल बोलताना मुक्ता म्हणाली, ‘मला सोनी वाहिनीकडून जेव्हा कथा ऐकवली, तेव्हा त्यातला अप्रोच मला आवडला. आज गेली दोन वर्ष आपण सगळेच एका परिस्थितीतून जात आहोत. एक तणाव जाणवत आहे. या कथेत मला एक पाॅझिटिव्हिटी जाणवली. मालिकेत सगळंच आहे. नाट्य आहे, पण एक प्लेझंटनेस आहे. तो मला जास्त आवडला. टीव्हीवर रोमँटिक गोष्ट करून मला बरीच वर्ष झाली. एका लग्नाची दुसरी गोष्ट केल्यानंतर मी आता पुन्हा एकदा रोमँटिक गोष्टीची मालिका करतेय. आणि उमेश, मुग्धा, रोहिणीताई सगळंच हवं असणारं होतं.’ मुक्ताला मीरामधलं काय आवडलं ? ‘ मीराच्या व्यक्तिमत्त्वातली इंटेन्सिटी मला आवडली. मीराचा प्रेमभंग होऊन दहा वर्ष झाली, तरीही त्याच्याविषयीचं प्रेम आजही तितकंच आहे. ते प्रेम अजून जात नाहीय. ती स्पष्टवक्ती आहे. ते मला आवडलं.’ पण मीराच्या काही गोष्टी मुक्ताला त्रासदायकही वाटतात. ‘ ती संतापी आहे. लगेच चिडते. ते तसं त्रासदायक आहे. तिच्याविषयी टेरर वाटते. आदिराज आणि तिच्यात घडलंय तेही तिच्या लगेच राग येण्यामुळेच.’ पण मीरा चांगली माणूस असल्याचं मुक्ता म्हणते. ती घरची जबाबदारीही घेते. मीरा आणि मुक्तामध्ये थोडं साम्य असल्याचंही मुक्ता सांगते. ‘त्या गोष्टी आपोआप येतात खरं तर. त्यात मीराला ठराविक चवीची काॅफी लागते. माझंही तसंच आहे. चहा- काॅफीची चव मला तशीच हवी असते. इथे सेटवरही दादा मला हव्या असलेल्या काॅफीचा घोट घशात जाईपर्यंत थांबतात. मग माझा दिवस चांगला जातो.’ मुक्ता पुढे सांगते की मालिकेत मीरा घरची जबाबदारी घेणारी आहे. पण मी खऱ्या आयुष्यात अजिबातच अशी नाही. कारण घरात मी धाकटी आहे. मालिकेत मनूची जी व्यक्तिरेखा आहे, तसा अटिट्युड माझा घरात असतो. आमच्या घरात माझ्यापेक्षा धाकटं म्हणजे आमचं मांजरच आहे.

  उमेश कामतनं 8 वर्ष का केलं नाही कुठल्याही मालिकेत काम? सांगितलं खरं कारण

  मुक्ता  हसून म्हणते, ‘ मीराच्या काही काही गोष्टी मला आवडतात. पण कधी कधी सिन करताना , अरे बापरे ही पण जबाबदारी घ्यायची का मी, असाही विचार येतो.’ पुढे मुक्ता असंही म्हणते की एखादी व्यक्तिरेखा करून, तुम्ही तसेच वागायलाही लागता. ह्याचं त्याच्यात, त्याचं ह्याच्यात जातं.’ मीराचा फ्लॅशबॅक साकारताना मुक्ताला ती स्वत:ची एनर्जी जाणवते. ती मॅच करू शकते. ते करताना बऱ्याच गोष्टी स्पाँटेनियस होतात, असं ती म्हणते. मीरा आणि मुक्ताची लग्नसंस्थेबद्दलची मतं बरीच सारखी आहेत. मुक्ता म्हणते, ‘माझंही मीरासारखंच म्हणणं आहे. ती एक घटना आहे. नक्कीच तो महत्त्वाचा टप्पा असू शकतो. त्याच्याशिवाय आयुष्य नाही, असं काही नसतं. योग्य माणसाशी झालं तर ठीक, नाही तर त्याचे पडसाद तुम्हाला भोगत राहावे लागतात.ज्यांना जे आतून वाटतं, त्यांनी ते करावं. जितकं शिक्षण महत्त्वाचं आहे, तितकंच लग्न. मी त्याचा आदरही करते.’ श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'या' मराठी मालिकेतून येणार भेटीला उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची केमिस्ट्री चांगलीच खुलतेय. उमेशबद्दल मुक्ता म्हणते, ‘उमेश हा फँटॅस्टिक व्यक्ती आहे. खूप छान सहकलाकार आहे. बुद्धिमान अभिनेता आहे. प्लेझंट माणूस आहे. सुखद वातावरणावर त्याचा माझ्यासारखा विश्वास आहे. तसं ते इथे आहे. आम्हाला एकत्र काम करायचं होतंच. एका लग्नाची दुसरी गोष्टमधला अबीर आणि राधा हा ट्रॅक लोकांना आवडला होता. अनेक वर्षांनी आम्हाला ती केमिस्ट्री अनुभवायला मिळतेय. त्याच्याबरोबर काम करताना छान वाटतंय.’ सध्या नाटकं बंद आहेत. एक निर्माती म्हणून मुक्ता याबद्दल काय म्हणतेय. ‘ अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, मान्य. पण बंद एसी हाॅलमध्ये तुम्ही एकत्र बसणं ही कल्पना मला बऱ्यापैकी भीतीदायक वाटते. येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अवघड आहे. आणि ५० टक्केच प्रेक्षक घ्यायचे, हे निर्मात्याला परवडत नाही.’ सध्या तरी मुक्ता नाटक निर्मिती करणार नाही. दिग्दर्शनाचाही तिचा सध्या विचार नाही. कोरोना काळात मुक्ताने वाचलेले इटालीयन लेखिकेचं वाचलेलं पत्र अनेकांना आवडलं होतं. कोरोना काळात मुक्ताने स्टोरीटेलसाठी वाचन केलंय. तिनं एक शाॅर्टफिल्म केलीय. शिवाय ऑनलाइन वर्कशाॅप घेत होती. सध्या पाऊस आहे. मुक्ता म्हणते, ‘ मला पावसात भिजायला आवडतं. मजा करायला आवडते. पण काम करायला आवडतं नाही.’ त्यामुळेच आता पावसात मुक्ता मालिकेतलीच बरसात अनुभवत आहे. ( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Mukta barve, Tv serial

  पुढील बातम्या