मुंबई, 25 जानेवारी : अभिनेता शाहरुख खान चा पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला मोठ्या धुमधडाक्यात संपूर्ण देशात रिलीज झाला आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पठाण सिनेमा अँडवान्स बुकींग करतच पहिल्या दिवशी हाऊसफुल्ल झाला आहे. मात्र पठाण रिलीज होताच मराठी सिनेमांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पठाण हा सिनेमा देशात 5200 स्क्रिन्ससह रिलीज झाला आहे. मुंबई पुण्यातील जवळपास सगळ्याच थिएटरला पठाण सिनेमाचे दिवसाला 4-4 शो लावण्यात आलेत. पठाणच्या शोमुळे मराठी सिनेमांच्या पोटावर पाय आला आहे. मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये स्क्रिन्स मिळत नाहीये. बांबू आणि पिकोलो हे दोन मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मिळत नसल्यानं मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्सना इशारा दिला आहे. पठाण सिनेमामुळे बांबू आणि पिकोलो सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नाहीये. त्यामुळे मनसे थेट मल्टिप्लेक्सनाच बांबू लावू असा थेट इशारा दिला आहे. पठाण हिट होतोय ही मोठी घटना आहे मात्र त्याचा फटका मराठी सिनेमांना बसत आहे. मात्र त्यासाठी मराठी सिनेमांचा बळी का द्यायचा. मराठी सिनेमांना त्यांच्या वाटा मिळायलाच हव्या, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे. हेही वाचा - Pathaan Release : अखेर शाहरुखचा ‘पठाण’ रिलीज! मुंबईसह पुण्यातील थिएटर बाहेर पोलीस सुरक्षा
मागच्या एक महिन्यापासून रितेश देशमुखचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. संपूर्ण जगभरात वेड रिलीज होऊन चांगलं कलेक्शन करत आहे. वाळवी सिनेमानं देखील दुसऱ्या आठवड्यात चांगली कमाई केली. त्यानंतर आज बांबू आणि पिकोलो सिनेमा रिलीज झालाय. व्हिक्टोरिया सिनेमा देखील सुरू आहे. यातल्या एकाही सिनेमाला चांगले मल्टिप्लेक्स, स्क्रिन्स किंवा थिएटर्स मिळत नाहीये. मी यो गोष्टीचा निषेध करतो. मल्टिप्लेक्स वाल्यांनी मराठी सिनेमांना चांगले थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स दिले नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. आम्ही बघून घेऊ की कसे मराठी सिनेमांचे थिएटर्स मिळत नाहीत, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
पठाण हा सिनेमा आज रिलीज झालाय. मुंबईसह पुण्यात प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती. सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल होता. सिनेमाच्या पहिल्या शोनंतरच पठाणचे 300 शो वाढवण्यात आलेत. हिंदी सिनेमातील आतापर्यंतचा पठाण हा सर्वांत मोठा रिलीज ठरला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत जगभरात एकूण 8000 स्क्रिन्ससह सिनेमा रिलीज झालाय.