मुंबई, 14 जुलै: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओक्केमध्ये’ या दमदार डायलॉगनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या शाहाजी बापू पाटलांची गेली अनेक दिवस चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यादरम्यान महाराष्ट्रातून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटातील शाहाजी बापू पाटील यांची दमदार ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळाला मात्र शाहाजी बापू पाटलांच्या या डायलॉगची हवा काही कमी झालेली नाही. पाटलांचा हाच दमदार अवतार चला हवा येऊ द्याच्या मंचावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (shahaji bapu patil in chala hava yeu dya) शाहाजी बापू पाटील त्यांच्या पत्नीसह झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. आपल्या वेगळ्या बोली आणि शैलीमुळे शाहाजी बापू पाटील प्रसिद्ध आहेत. चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता त्यांच्या जगप्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवणार का? पाटील कोणतं वक्तव्य करणार याकडे सर्वांचं लक्ष आहेत. यावेळी शाहाजी बापू पाटलांबरोबर त्यांच्या पत्नी रेखा पाटीलही उपस्थित राहणार आहेत. शाहाजी बापू पाटलांच्या फॅन पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. शाहाजी बापू पाटलांना हवा येऊ द्याच्या मंचावर पाहण्यासाठी सर्वांनी उत्सुकता दाखवली आहे.
हेही वाचा - Santosh Juvekar : ‘माफी मागतो मी वाचवू शकलो नाही’; अभिनेत्याबरोबर घडला धक्कादायक प्रसंग, ऐका त्याच्याकडूनच शाहाजी बापू पाटील हवा येऊ द्या थुकरट वाडीत येणार म्हटल्यावर थुकरट वाडीतील कलाकारांनीही जय्यत तयारी केली आहे. शाहाजी बापू पाटील आणि त्यांची पत्नी रेखा पाटील यांच्यासाठी भाऊ, डॉक्टर, कुशल एक खास गाणं सादर करणार आहेत. झी मराठीच्या सोशल मीडियावर एपिसोडचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात शाहाजी बापू पाटलांसाठी तयार केलेलं खास धम्माल गाणं कलाकार गाताना दिसत आहेत. त्यावर पाटील दाम्पत्य पोट धरुन हसताना दिसत आहे.
शाहाजी बापू पाटील यांचा हा विशेष एपिसोड पुढील आठवड्यात चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा डायलॉग ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी उत्सुकता दाखवली आहे. या एपिसोडमध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरही दिसणार आहेत.