मुंबई, 18 एप्रिल: ललिता पवार (Lalita Pawar) हे नाव घेतलं, की आपल्या डोळ्यांसमोर पटकन उभी राहते ती रामायण (Ramayana) मालिकेतली मंथरा (Manthara) किंवा अनेक चित्रपटांमध्ये साकारलेली खाष्ट सासू. बारीक डावा डोळा आणि थोडासा वाकडा चेहरा आणि त्यावरचे हावभाव पाहिले, की मंथरेचा कपटीपणा वेगळा सांगण्याची गरजच लागत नसे. तीच गोष्ट अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधल्या खुनशी सासूबाईंची. या रोल्समुळे चित्रपट पाहणाऱ्या सुना या कपटी सासूच्या नावाने अक्षरशः कडाकडा बोटं मोडायच्या. अर्थात ही ताकद ललिता पवारांच्या अभिनयाची. 18 एप्रिल 1916 रोजी जन्मलेल्या ललिता पवार यांचा 24 फेब्रुवारी 1998 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या काही खास आठवणी ललिता पवार यांचा बारीक डोळा आणि थोडासा वाकडा चेहरा यांचा त्यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये पुरेपूर वापर करून घेतला. त्यांच्या मूळच्या अभिनय कौशल्याला त्याची चांगली साथ मिळाली; पण त्यांचा चेहरा जन्मापासून तसा नव्हता. एका अपघातामुळे त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती आणि त्यातून त्यांना ही देणगी मिळाली. हे वाचा- Yash चा बॉडीगार्ड होता केजीएफचा हा भयावह व्हिलन, वाचा ‘गरुडा’ची सुपरस्टार बनण्याची कहाणी चेहरा कायमस्वरुपी बिघडला, तरी जिद्द नाही हरली ही गोष्ट आहे 1942 सालच्या जंग ए आझादी या सिनेमाच्या सेट्सवरची. त्या सिनेमात फिल्ममेकर भगवानदादा (Bhagwandada) ललिता पवार यांच्या कानशिलात लगावतात, असा एक प्रसंग चित्रित करायचा होता. त्या प्रसंगाच्या चित्रिकरणावेळी भगवानदादांनी इतक्या जोरात ललिता पवार यांच्या कानशिलात लगावली, की त्या भेलकांडून पडल्या. तब्बल तीन महिने त्यांच्या चेहऱ्याच्या एका बाजूच्या संवेदनाच नाहीशा झाल्या होत्या. शिवाय त्यांचा एक डोळा कायमस्वरूपी बाद झाला. एका अभिनेत्रीसाठी चेहऱ्याला दुखापत होणं म्हणजे करिअर संपल्यातच जमा; पण ललिता पवार यांनी मात्र ती इष्टापत्ती मानली. त्या खचून गेल्या नाहीत. त्यांनी डावा बारीक झालेला डोळा आणि वाकडा चेहरा यांच्यासह त्यांनी अनेक कपटी सासूबाईंच्या भूमिका जिवंत केल्या. व्ही. शांताराम यांच्या दहेज या 1950 सालच्या सिनेमापासून ललिताबाईंच्या अशा भूमिकांची सुरुवात झाली. त्यानंतर 1950-60च्या दशकात अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. हे वाचा- आथियाने दिली राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली, वाढदिवशी शेयर केले Romantic Photo शिक्षण नसूनही गाजवला मोठा पडदा ललिता पवार यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लौकिकार्थाने शिक्षण काहीही झालेलं नव्हतं; मात्र आपल्या अभिनयकौशल्याच्या आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी तब्बल 700 सिनेमांमध्ये काम करून रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. 1928 साली राजा हरिश्चंद्र या मूकपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यासाठी त्यांना 18 रुपये मानधन मिळालं होतं. ललिता पवार यांचे वडील लक्ष्मणराव शगुन हे श्रीमंत बिझनेसमन होते. ललिता यांची आई अनसूया प्रेग्नंट असताना अंबादेवीच्या देवळात गेली होती. तिथेच त्यांना कळा सुरू झाल्या आणि ललिता यांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना अंबिका असं नाव सुरुवातीला ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांना ललिता म्हणू लागले. त्या वेळी मुलींना शाळेत पाठवणं फारसं चांगलं मानलं जायचं नाही. त्यामुळे ललिता कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्या काळी महिलांनी चित्रपटात काम करण्यालादेखील प्रतिष्ठा नव्हती. तरीही त्यांनी आपल्या कौशल्याने वाहवा मिळवली. हृषीदांनी आधी अनाडी आणि नंतर आनंद या सिनेमांमध्ये ललिता यांच्याकडून व्हिलनच्या भूमिका करून घेतल्या. अनाडीतल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यांच्याकडे खूप टॅलेंट होतं, असं हृषीदा फर्स्टपोस्टशी बोलताना म्हणाले होते. हे वाचा- VIDEO: Tattoo नकोच गं बाई! नागा चैतन्यसाठी 3-3 टॅटू काढणारी समंथा आता असं काय म्हणाली? खाष्ट सासूच्या विरुद्ध होता खरा स्वभाव वहीदा रेहमान आपली आठवण सांगताना म्हणाल्या होत्या, की ललिता पवार यांनी त्या वेळी अनेक अभिनेत्रींना सिनेमांमध्ये सासुरवास केला; मात्र प्रत्यक्ष जीवनात त्यांचा स्वभाव एकदम विरुद्ध म्हणजेच खूप चांगला होता. एकंदरीत आपल्या टॅलेंटच्या आणि जिद्दीच्या जोरावर ललिता यांनी एवढं मोठं संकट येऊनही धीराने वाटचाल केली आणि लोकप्रियता मिळवली. त्यांना आदरांजली!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.