मुंबई, 08 जून: बॉलिवूडची ब्लॅक ब्यूटी, कधी सिमरन तर कधी अंजली बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल (Kajol) काजोलने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे प्रेक्षकांना दिले. तगडी फॅन फॉलोविंग असलेल्या काजोल पाहण्यासाठी प्रेक्षक आजही तितकेच उत्साही असतात. काजोलनं नुकतीच ‘सोनी मराठी’वरील (Sony Marathi) ‘कोण होणार मराठी करोडपती’च्या (Kon Honar Marathi Crorepati ) मंचावर पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. काजोल तिच्या आईबरोबर कार्यक्रमात सहभागी झाली होती. शोमध्ये काजोलनं सचिन खेडेकरांशी (Sachin Khedekar) थेट अस्खलित मराठीत गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान तिनं तिच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट सांगितली. कोण होणार मराठी करोडपतीच्या मंचावर काजोलनं तिला कधीच बॉलिवूडमध्ये काम करायचं नव्हतं, असा धक्कादायक खुलासा केला. ‘मला कधीच बॉलिवूडचा हिस्सा बनायचं नव्हतं. मला या इंडस्ट्रिचा कधीही भाग व्हायचं नव्हतं. मला नोकरी करायची होती. दर महिन्याला मला पगाराचा चेक हवा होता तो चेक माझ्या अकाऊंटमध्ये जमा झाला असता आणि मी सुखात जगले असते’, असं काजोल म्हणाली . काजोलच्या या खुलास्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.
हेही वाचा - अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं OTTवर दमदार पदार्पण; The Broken News प्रेक्षकांच्या भेटीला काजोलनं याआधीही 2019मध्ये PTI ला दिलेल्या मुलाखतीत अशाप्रकारचं वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती, ‘मला चांगली सुरुवात मिळाली नाही. माझ्या पहिल्या सिनेमानं चांगलं काम केलं नाही. त्यामुळे अभिनयाकडे मी कधीच माझं करियर म्हणून पाहिलं नव्हतं. माझ्याबरोबर जे झालं त्याच्याबरोबर मी पुढे जात पाहिली. मी नेहमीच सिलेक्टिव्ह सिनेमांमध्येच काम केलं’.
काजोलला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन आता 30 वर्ष उलटून गेली आहेत. 1992 साली तिनं ‘बेसुदी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘बाजीगर’, ‘ये दिल्लगी’, ‘करण अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ ते आता आलेल्या ‘तान्हाजी’ सारख्या अनेक दमदार सिनेमात काजोलनं काम केलं आहे. ‘कोण होणार मराठी करोडपती’च्या येत्या भागात काजोलची मस्ती आणि तिचे धम्माल किस्से ऐकायला मिळणार आहेत. निवेदक सचिन खेडेकर यांनी काजोल आणि तिच्या आईला मराठीतून प्रश्न विचारत बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे. काजोल सेटवर धडपडली की सिनेमा हीट होतो या अफवेवरचा एक धम्माल किस्साही तिनं यावेळी सांगितला आहे.