मुंबई, 25 जुलै: आपल्या उत्तम अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते किरण माने सर्वांचे लाडके अभिनेते झाले आहेत. आपली मनं परखडपणे मांडणाऱ्या किरण मानेंची मोठी फॅन फॉलोविंग आहे. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नेहमीच ते आपल्या माणसांविषयी त्यांच्या भावना त्यांची मतं मांडत असतात. याच किरण मानेंना मात्र लहानपणी खाडकन मुस्काडात बसायची. असं का व्हायचं याचं कारण त्यांनी एका पोस्टमधून सांगितलं आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यांच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. किरण मानेंना दोन सख्ख्या बहिणी आहेत. कविता आणि कीर्ती अशा दोन बहिणींचे किरण हे एकूलते एक भाऊ. त्यामुळे लहानपणी दोघींमुळे किरण यांनी अनेकदा मार खाल्ला आहे. आज किरण यांची एक बहिण कविता हिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत जुन्याआठवणींना उजाळा दिला आहे. किरण शाळेत असताना मारामारी करायचे आणि घरी जायचे. पण ते घरी पोहोचायच्या आधीच ही खबर बहिणीने आईला सांगितलेली असायची. याविषयी किरण मानेंनी म्हटलंय, ‘मी घरी पोहोचायच्या आत ‘चहाडी’ करून झालेली असायची. घरी आल्यावर आई शांतपणे विचारायची ‘शर्ट का खराब झालाय?’ मी थाप मारायचो, ‘खेळताना पडलो’. एका सेकंदाच्या आत खाडकन मुस्काडात बसायची. “मला सगळं कळलंय.” मग खरडपट्टी. कुणी लावालावी केली असणार हे लगेच लक्षात यायचं माझ्या. मी रागात माझी बहीण कवीताकडं पहायचो. मग खुन्नस. हेही वाचा - #BBM4 : प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, मराठी मनोरंजनाचा Bigg Boss येतोय, लवकरच…
किरण आणि त्यांची बहिण कविता यांच्यात दोन वर्षांचं अंतर आहे. दोघेही लहान असताना खूप भांडायचे, असं किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय. ‘खरंतर तिचा लै जीव माझ्यावर. पण मला ते उशीरा कळलं. कविताचं लग्न लागलं आणि ती सासरी जायला निघाली त्याक्षणी पहील्यांदा तिची किंमत मला कळली ! आतून खूप काहीतरी तुटल्यासारखं झालं. माझं काहीतरी हक्काचं-जवळचं माझ्यापासून दूर जातंय या भावनेनं अक्षरश: हादरलो-कळवळलो. तिथुन पुढं कधीच भांडलो नाही तिच्याशी.
किरण मानेंनी पुढे म्हटलंय, ‘माझ्या प्रत्येक चढउतारांत कविता माझ्या सोबत असणार हे मी कायम गृहित धरल्यासारखंय. ती कुठेही असो, माझ्याकडे तिचं बारीक लक्ष असतं. शाळेतल्यासारखंच ! फेसबुकवर मी काय पोस्ट करतो, कुठे काय कमेंट करतो, कुणाशी वादविवाद करतो. सगळ्या चहाड्या अजूनही केल्या जातात. फक्त हल्ली माणूस बदललंय. आईऐवजी वहिनीकडं चुगल्या असतात. पण आता मी खुन्नस धरत नाही. कारण यामागचा गोडवा मला जाणवलाय माया कळलीये’. हेही वाचा - ‘लागिरं झालं जी’ ते ‘देवमाणूस’ या मालिकांची श्वेता शिंदेने केलीय निर्मिती; आता ‘आप्पी आमची कलेक्टर’ येतेय भेटीला किरण मानेंच्या अभिनयाच्या प्रवासात त्यांना त्यांच्या बहिणीची फार मदत झाली आहे. किरण यांची बहिण कविता नाटक आणि सिनेमाची उत्तम जाणकार आहे आणि त्या परखड समीक्षण करतात. त्यामुळेच किरण यांना त्यांच्या अभिनय प्रवासात याचा फायदा झाला. याविषयी किरण मानेंनी म्हटलंय, ‘माझं प्रत्येक नाटक-प्रत्येक सिनेमा-प्रत्येक सीन-प्रत्येक एपिसोड, त्यातला माझा अभिनय अत्यंत बारकाईनं पाहून त्यावर सखोल चर्चा करते ती. स्पष्ट मतं मांडते’. बहिणीच्या वाढदिवशी किरण मानेंनी शेवटी बहिणीला घरी काही मटण मासे करत बसू नको. मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊ आणि सेलिब्रेट करु असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.