मुंबई, 1 सप्टेंबर : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा होते. या कार्यक्रमाचा प्रत्येक एपिसोड हिट ठरतो. या शो मध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटीज आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी वेगवेगळे खुलासे करतात जे पुढे चर्चेचे विषय ठरतात. ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनचा ९ वा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सोबतच करण जोहर लवकरच कलर्स टिव्ही या वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्सिंग रियालिटी शोच्या नव्या सिझनमध्ये दिसणार आहे. तो या शो मध्ये परीक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतंच करणने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. सध्या बॉलिवूडमध्ये बॉयकॉट संस्कृतीचा ट्रेंड आहे. या बॉयकॉट करण्याच्या संस्कृतीमागे करण जोहर हा एका कारणांपैकी आहे. त्याने बॉलिवूडमध्ये नेपोटीझम रुजवले असे प्रेक्षकांचे मत आहे. इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीत करण जोहरने बॉलिवूडच्या बॉयकॉट संस्कृतीवर त्याचे मत मांडले आहे. तो म्हणाला कि, ‘‘सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना तुम्हाला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. जर तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याच पद्धतीचे वातावरण तुमच्या सभोवती निर्माण होईल. ट्रोल्ससारख्या नकारात्मक बाबींकडे लक्ष दिल्यावर तु्म्ही देखील नकारात्मक व्हाल. याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल’’ असे मत त्याने व्यक्त केले.
बॉयकॉट संस्कृतीवर आतापर्यँत आलिया भट्ट, करीन कपूर, अर्जुन कपूर या कलाकारांनी त्यांचे मत व्यक्त केले होते. पण त्यांना त्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता करणं जोहरच्या या मतावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - Brahmastra : ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर; कोणती भूमिका साकारणार शाहरुख पाहा करण जोहरचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यांच्यासोबतच चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय या कलाकारांचे पॉवर पॅक्ड भूमिका बघायला मिळणार आहेत. तसेच शाहरुख खान सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.