मुंबई, 10 फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने (BMC) बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) नोटीस (Notice) बजावली होती. तिने खार येथील एका अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर बांधकाम (Illegal) केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला होता. हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबद्दल मुंबई महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीस विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल केली होती. आता तिने ही याचिका मागे घेतली आहे. हा निर्णय स्वत: कंगनाने घेतला आहे. आज झालेल्या सुनावणीत कंगनाच्या वकिलांनी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. कंगना आता फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदेशील बांधकामांना परवानगी मिळवण्यासाठी बीएमसीकडे अर्ज करणार आहे. यानंतर उच्च न्यायालयानं सांगितलं की, बीएमसीला चार आठवड्यांत कंगनाच्या अर्जावर निर्णय द्यावा लागेल, तोपर्यंत संबंधित कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. (हे वाचा- अखेर कंगना रणौत Twitter ला करणार रामराम! आता या प्लॅटफॉर्मवर मांडणार मतं) जर बीएमसीचा आदेश कंगनाच्या विरोधात गेला, तर बीएमसीने कंगनाला या आदेशाविरूद्ध अपील करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी द्यावा. म्हणजेच, बीएमसीचा निर्णय कंगनाच्या विरोधात गेला तरी बीएमसी दोन आठवड्यांपर्यंत कोणतीही कारवाई करू शकणार नाही. अलीकडेच बीएमसीने कंगना रणौतच्या पाली हिल जवळील कार्यालयाच्या कथित बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोजर चढवला होता. त्यानंतर, मुंबईतील खार येथील कंगनाच्या फ्लॅटमध्ये केलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामांबाबतही पालिकेने नोटीस बजावली आहे. (हे वाचा- आर्चीनं पुन्हा याड लावलं! रिंकूच्या नव्या लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ) या प्रकरणात बीएमसीने सांगितलं की, कंगनाच्या ऑफिसपेक्षा तिच्या घरात बीएमसी नियमांचं अधिक उल्लंघन झालं आहे. कंगना रणौत खार वेस्टच्या 16 क्रमांकाच्या रोडवरील DB Breeze या इमारतीच्या 5 व्या मजल्यावर राहते. या मजल्यावर कंगनाचे एकूण 3 फ्लॅट आहेत. 8 मार्च 2013 रोजी या तिन्ही फ्लॅटची नोंद कंगनाच्या नावावर झाली आहे. बीएमसीने पुढे सांगितलं की, 13 मार्च 2018 रोजी म्हणजेच कंगनाचा फ्लॅट घेतल्याच्या पाच वर्षांनंतर तिने फ्लॅटमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार मिळाली होती. तिने या सर्व फ्लॅटला एकत्र करुन मोठं घर बनवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.