मुंबई, 09 नोव्हेंबर : मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता आस्ताद काळे सध्या चर्चेत आला आहे. आस्ताद त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमचं चर्चेत असतो. बिग बॉसच्या मराठीच्या घरातही आस्तादचा स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. आपली ठोस आणि ठाम मतं तो नेहमी व्यक्त करत असतो. यावेळी देखील आस्तादनं स्पष्टमत मांडलं आहे मात्र त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. आस्तादनं सध्या राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल सुरु असलेल्या वादावर त्याचं मत व्यक्त केलं आहे. आस्तादनं फेसबुक पोस्ट लिहित स्पष्ट मतं मांडलं आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाविषयी बोलताना आस्ताद म्हणाला कि, ‘‘कुठलाही चित्रपट किंवा नाटक, पदरचे पैसे(प्रामाणिक कमाईचे) खर्च करून बघायला गेलेल्या सामान्य प्रेक्षकाला धमकावणं, मारहाण करणं हे कसलं लक्ष मानावं? या कृत्यातून काय साध्य झालं असं मानायचं? आम्ही काय बघावं, अथवा बघू नये, हे ठरवायला आधीच censor board बसवलेलं आहे. त्यात आता या भीतीची भर??!!’’ हेही वाचा - दिग्दर्शकानंतर हर हर महादेव सिनेमाच्या वादावर Zee Studioचा खुलासा; म्हणाले, इतिहास गैरपद्धतीनं… तो पुढे म्हणाला कि, ‘‘मी “हर हर महादेव” पाहिला नाहीये. त्यामुळे मी चित्रपटाबद्दल काही बोलणार नाही. पण तो बघायला जाताना अशी भीती बाळगून जायचं असेल तर अवघड आहे!!!! “आपल्याच मुलुखातील रयत आपल्याच मुलुखात दहशतीखाली राहते आहे, हे फार फार अनुचित आहे” हे छत्रपती शिवरायांना बोचणारं शल्य होतं. ते प्रेक्षक हेच मतदारही आहेत.’’ असं मत आस्तादनं व्यक्त केलं आहे.
आस्तादच्या या स्पष्टवक्तेपणामुळे तो पुन्हा चर्चेत आलाच आहे. त्याचं हे मत अनेक चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पटलं असून त्यांनी कमेंट करत आस्तादच्या या पोस्टवर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान राज्यात सध्या ‘हर हर महादेव’ या सिनेमावरून गदारोळ सुरु आहे. हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आलाय. राजकीय पक्ष तसंच अनेक संघटनांकडून सिनेमाला विरोध दर्शवण्यात आला आहे. सिनेमातील इतिहास हा तोडून मोडून दाखवण्यात आल्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे. परिणामी मागील दोन दिवसात हर हर महादेव सिनेमाचे ठाणे तसेच पुण्यातील शो बंद पाडण्यात आले. सिनेमाच्या टीमला संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. त्यानंतर आता सिनेमाच्या वादावर झी स्टुडिओनं भाष्य करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

)







