मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अत्यंत गोड आणि जादुई आवाज असणाऱ्या सिडचा चाहतावर्ग फक्त तमिळ, तेलगू भाषिकांपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातसुद्धा त्याची गाणी आवर्जून ऐकली जातात. तरुणाईला भुरळ पाडलेल्या या गायकाचा जन्म अमेरिकेत झाला. देशाबाहेर मोठा झालेला असूनही सिड आवर्जून हिंदी आणि चक्क मराठी गाणी सुद्धा ऐकतो. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सिडने त्याच्या आवडत्या बॉलिवूड गाण्यांबद्दल खुलासा केला होता. प्यासा या जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपटाची गाणी तसंच ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ताल या चित्रपटाची गाणी त्याला आवडतात. मराठी गाण्यांमध्ये विशेष करून कुमार गंधर्वांचं उठी उठी गोपाळा गाणं त्याला भावतं.
सिडने नुकतीच मराठी इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्याने बॉलिवूडमध्ये झुंड (Jhund) या चित्रपटातून गायक म्हणून पदार्पण केलं तुम्हाला माहित आहे का या चित्रपटाची ऑफर संगीतकार अजय-अतुल यांनी स्वतःहून त्याला दिली. सिड यावर सांगतो, “मला अजय-अतुल यांच्याकडून कॉल आला होता. त्यांना पहिल्यांदा भेटल्यावरच मला जाणवलं की ते माणूस म्हणून खूप उत्तम आहेत. माझं बॉलिवूड पदार्पण मला एका महत्त्वाच्या, चांगल्या प्रोजेक्ट मधून व्हावं असं वाटत होतं. माझ्या कामाबद्दल लोकांना अभिमान वाटावा अश्या प्रोजेक्टचा भाग होणं खूप गरजेचं होतं. ते मला झुंड मधून मिळालं.” हे ही वाचा- महात्मा गांधींच्या आयुष्यावर बनणार वेब सीरिज, प्रतीक साकारणार बापूंची भूमिका सिड श्रीरामने काही वर्षांपूर्वी अप्सरा आली (apsara ali) गाण्याचा एक विडिओ पोस्ट करुन सगळ्यांची मनं जिंकली होती. सिडच्या अनेक गाण्यांचे मराठी चाहते ह्या गाण्यांनंतर त्याच्या मराठी पदार्पणाबद्दल देखील विचारणा करत होते. “मला लवकरच म्हणजे अगदी येत्याच वर्षात मराठी गाणं गायला मिळावं ते अजय अतुल यांचं असावं,” अशी इच्छा सिड श्रीरामने व्यक्त केली. सिडचं पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली (Srivalli) गाणं तुफान वायरल झालं होतं. ए.आर रहमान च्या अदिये गाण्यातून त्याच्या करिअरची सुरवात झाली. सिड श्रीरामचा जन्म चेन्नईमध्ये झाला असून त्यानंतर लगेचच तो अमेरिकेला गेला. त्याची आई त्याची पहिली गुरु असल्याचं तो सांगतो. द हिंदू सोबतच्या मुलाखतीत त्याने लहानपणीचे आणि त्याच्या सुरवातीच्या काळातले बरेच अनुभव सांगितले आहेत.