मुंबई 5 ऑगस्ट : बॉलिवूडची अंजली अर्थातच अभिनेत्री काजोलचा (Kajol Devgn) आज वाढदिवस. काजोल तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात काजोलचा जन्म झाला होता. काजोलची आई म्हणजेच अभिनेत्री तनुजा या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आहेत. तर तिचे वडील हे दिग्दर्शक आणि निर्माते होते. 1992 साली ‘बेखुदी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं. काजोलच्या चित्रपटांतील लव्हस्टोरी जेवढ्या हिट ठरल्या तितकीच तिची खऱ्या आयुष्यातील प्रेमकाहानीही हीट ठरली होती. काजोल आणि अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) यांनी 1999 साली विवाह केला होता. पण त्याआधी काही वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. दोन चित्रपटांत एकत्र काम केल्यानंतर काजोल आणि अजय यांचे सूत जुळले होते. आणि ते एकमेकांना डेट करू लागले होते. काजोलने ही गोष्ट आपल्या आईला किंवा कोणत्याही कुटुंबियांना सांगितली नव्हती. तर आईची यावर काय प्रतिक्रिया असेल याची भिती काजोलला वाटत होती. याच विषयी काजोलची आई तनुजा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
तनुजा म्हणाल्या, “काजोल माझ्याकडे आली आणि म्हणाली मॉम मी प्रेमात आहे”. आणखी काही प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली “आई तु त्याचे डोळे पाहायला हवे.” आणि शेवटी तिने सांगितलं की ती अजयच्या प्रेमात आहे. पुढे तनुजा म्हणाल्या की, हे त्यांच्यासाठी अगदीच सरप्राइज होतं. कारण त्या अजयच्या वडीलांना खूप चांगलं ओळखायच्या. त्या म्हणाल्या, “मला माहीत होतं अजय हा विरु यांचा मुलगा आहे. विरु जी फारच रुबाबदार आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व होतं. आणि अजय देखील त्यांच्यासारखाच किंबहूना त्यांच्याहून अधिक दिसायला चांगला आणि आकर्षक आहे.” काजोल आणि अजय यांनी त्यानंतर विवाह केला. त्यांना दोन मुलं देखील आहेत. मुलगी नायसा आणि मुलगा युग अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. दोघेही मागील वर्षी ‘तान्हाजी : द अनंसंग वॉरिअर’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.