मुंबई, 07 जून : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक क्राइम थ्रिलर वेब सीरिजचा सध्या ट्रेंड पाहायला मिळतोय. नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी माध्यमावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरीज ‘स्कूप’ विरोधात गँगस्टर छोटा राजननं आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. इतर सर्वांची नावं बदलली, शिक्षा झालेल्या इतरांचीही नावं बदललीत मग केवळ माझंच खरं नाव का कायम ठेवलं ? असा सवाल छोटा राजन याने याचिकेतून केला आहे. वेब सीरीजमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचा राजनचा दावा त्यानं केला असून छोटा राजनच्या याचिकेवरील सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. हंसल मेहता यांनी स्कूल ही वेब सीरिज 2जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. अंडरवर्ल्ड, दहशतवाद, गुन्हेगारी या सर्व विषयांवर आधारित या वेब सीरिजनं काही दिवसात प्रसिद्धी मिळवली. स्वत: बाजू मांडण्यासाठी लढणाऱ्या काही पत्रकारांवर ही सीरिज आधारित आहे. जिग्ना व्होरा यांनी लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्कावर आधारित असून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एक फोन आल्यानंतर पत्रकार असलेल्या जागृती पाठक हिचं आयुष्य कसं बदलतं हे यात दाखवण्यात आलं आहे. दरम्यान या वेब सीरिज रिलीज करण्याआधी माझी पूर्व सहमती न घेता माझी प्रतिमा मलीन केली गेली आहे, असं म्हणत हायकोर्टात याचिका दाखल केली. हेही वाचा - प्रभासला पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; जय श्रीरामच्या गजरात Adipurushचा नवीन अॅक्शन Trailerरिलीज छोटा राजन सध्या तिहार जेलमध्ये आहे. कोर्टाने स्कूप ही सीरिज रिलीज होऊ नये आणि त्याचा ट्रेलर काढून टाकावा अशी मागणी छोटा राजनने केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.
शुक्रवारी म्हणजेच 2 जून रोजी जेलमध्ये असलेल्या गँगस्टर राजेंद्र निकल्जे उर्फ छोटा राजनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने हंसल मेहता आणि नेटफ्लिक्स एंटरटेनमेन्ट सर्व्हिसेस इंडियासह स्कूप सीरिजच्या निर्मात्यांना छोटा राजनच्या याचिकेला 7 जून पर्यंत उत्तर देत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज कोर्टात सीरिजच्या निर्मित्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाकडून सांगण्यात आलं की स्कूप ही वेब सीरिज आता रिलीज झाली आहे. त्याचे सगळे एपिसोड स्ट्रिम झालेत. हे प्रकरण आता पुढच्या तारखेला हाताळण्यात येईल. कोर्टाने छोटा राजनच्या याचिकेवरील सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब केली.