मुंबई, 30 जून: महाराष्ट्र राज्याला एकनाथ शिंदे ( Maharashtra New CM Eknath Shinde) यांच्या रुपानं नवे मुख्यमंत्री मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय सामाजिक तसेच सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिंदे समर्थकांच्या आनंदाला उधाण आलं आहे. सिनेविश्वातूनही अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak) यानं शुभेच्छा दिल्यात. प्रसाद यानं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamveer Mukkam Post Thane) या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे ( Dharamveer Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रसाद आणि एकनाथ शिंदे यांच्यात फार चांगले संबंध आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच प्रसाद ओकनं त्यांना शुभेच्छा देत खास फोटो देखील शेअर केलाय. प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमातील एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये धर्मवारींच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकनं एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो धर्मवीरच्या ट्रेलर लाँच वेळीचा असून या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. तर दुसरा फोटो हा धर्मवीर सिनेमातील आहे. एकनाथ शिंदे देवाच्या पाया पडत असताना आनंद दिघे त्यांना पाहत आहेत. हे दोन्ही फोटो आताच्या घडीला फार मोठा अर्थ सांगून जात आहेत.
हेही वाचा - VIDEO:आम्ही पुन्हा आलो! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या कलाकारांचा जल्लोष नक्की कुणासाठी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत प्रसाद ओक यानं म्हटलंय, ‘मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!’, प्रसादच्या या शुभेच्छांमध्ये त्याचा एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्याबद्दल असलेला अभिमान आणि भावना दिसून आल्या आहेत. धर्मवीर सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील प्रसाद ओकनं शेअर केलेल्या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. प्रसाद ओकनं धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी दिघेंच्या वेशातील प्रसाद ओक स्टेज आला तेव्हा एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे समोर उभे असल्याचा भास झाला आणि त्यांनी प्रसाद ओकच्या भूमिकेत असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंचे पाय धरले. हा प्रसंग कायम सर्वांच्या लक्षात राहणार आहे.