मुंबई, 18 मे: सेलेब्रिटीजचं लग्न जसं चर्चेचा विषय असतं, तसंच त्यांचे घटस्फोटही चर्चेचा विषय असतो. सध्या बिल गेट्स यांचा घटस्फोट चर्चेचा विषय आहे. त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सर्वांसमोर आणल्या जात आहेत. याचा परिणाम त्या जोडप्यांच्या मुलांवर होत असतो, विशेषतः मुलं लहान असतील तर याचा परिणाम अधिकच होत असतो. आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही होऊ नये, यासाठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ह्रषीकेश पांडे याने गेली अनेक वर्षे आपल्या विभक्त आयुष्याबद्दल कधीही वाच्यता केली नाही.
2014 पासूनच विभक्त राहणाऱ्या हृषीकेश पांडे (Hrishikesh Pandey) आणि त्रिशा दुभाष (Trisha Dubash) यांना सात वर्षांनंतर घटस्फोट मिळाला आहे. 17 वर्षांचं त्यांचं वैवाहिक आयुष्य कायदेशीररित्या आता संपुष्टात आलं आहे. त्यांचा मुलगा दक्ष याची कस्टडी हृषीकेशला मिळाली आहे. त्यानंतर प्रथमच हृषीकेशनं याबाबतीत माध्यमांना खुलेपणानं सांगितलं आहे. अर्थात वैवाहिक आयुष्य संपलं असलं, तरी हृषीकेशचा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. आता लगेच तो कोणत्याही नव्या नात्यासाठी तयार नाही, पण आहे त्या आयुष्यात खुश आहे, असंही त्यानं स्पष्ट केलं आहे.
नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, हृषीकेश पांडे यानं एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबाबत माहिती दिली. सोनी टीव्हीवरील गाजलेली मालिका सीआयडीमध्ये (CID) महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हृषीकेश पांडे याने ये रिश्ता क्या कहलाता है, जग जननी मां वैष्णोदेवी अशा अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 2004 मध्ये त्यानं त्रिशा दुभाष हिच्याशी विवाह केला होता, पण काही वर्षातच त्यांचं पटेनासे झालं. 2014 मध्ये दोघांनी वेगवेगळं राहायला सुरुवात केली आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. काही कारणांनी ही प्रक्रिया रखडली आणि तब्बल सात वर्षांनी यंदा त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाल्याचं हृषीकेश यांने सांगितलं.
हृषीकेश आणि त्रिशा यांना दक्ष नावाचा एक मुलगा असून आता तो 12 वर्षांचा आहे. या दोघांनी स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली, तेव्हा तो पाच वर्षांचा होता. घटस्फोटाच्या बातम्या, चर्चा यामुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ नये, तसंच आपल्या खासगी आयुष्याची चर्चा होऊ नये असं वाटतं यामुळे इतक्या वर्षात कधीही याबाबत जाहीररीत्या सांगितलं नसल्याचं हृषीकेशनं स्पष्ट केलं. आता दक्ष मोठा झाला असून खूप समंजस असल्यानं, तसंच आता कायदेशीररीत्या घटस्फोट झाल्यानं जाहीरपणे बोलायला हरकत नाही, असंही त्यानं नमूद केलं.
त्रिशा आणि हृषीकेश यांनी अत्यंत समंजसपणे ही स्थिती हाताळली असून, हृषीकेशनं आपल्या मुलाला कधीही त्याच्या आईला भेटण्याची मोकळीक दिली आहे. त्याचे तिकडच्या आजी-आजोबांशी चांगले संबंध आहेत. आपल्या सासू सासऱ्यांनीदेखील आम्ही विभक्त होणार म्हटल्यावर काहीही आढेवेढे न घेता आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यांबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यानं म्हटलं आहे.
‘वेगळं राहण्याच्या काळात सगळं चांगलं असल्याचं दाखवत जगत राहणं खूप कठीण होतं. मी दिवस-दिवस शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं मुलाला हॉस्टेलवर ठेवलं होतं. त्यावेळी त्याच्या शाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी काम संपवून रात्रभर ड्रायव्हिंग करून मी त्याच्या शाळेत जात असे, पण आता दक्ष थोडा मोठा झाल्यानं माझ्या कामाचं स्वरूप त्याला समजू शकतं. त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत, असंही हृषीकेशनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.