मुंबई, 18 मे : एकीकडे कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट असताना, दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाचं (Cyclone Taukte) संकट आलं. या संकटाच्या काळात पोलीस खंबरपणे उभे आहेत. संपूर्ण जनतेचं, नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस ऊन, पाऊस, वारा या कोणत्याही परिस्थिती सज्ज आहेत. असाच एक व्हिडीओ अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुफान पावसात मुंबई पोलीस आपलं कर्तव्य बजावताना दिसतात. या मुसळधार पावसात त्यांच्याकडे ना छत्री आहे, ना रेनकोट, पण या सगळ्याची कोणतीच पर्वा न करता ते भर पावसात उभं राहून आपलं कर्तव्य बजावत आहेत.
प्राजक्ता माळीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे, असं म्हणत तिने पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोणत्याही संकटकाळी मुंबई पोलीस नेहमीच खंबरपणे उभे राहून, लोकांची सेवा करत आहेत. प्राजक्ताने शेअर केलेला हा व्हिडीओ पोलिसांची आपल्या कामाप्रती, लोकांप्रती असलेली निष्ठाच सर्व काही सांगून जातेय.
दरम्यान, कोरोनाच्या कठीण काळातही पोलीस आपल्या ड्यूटीवर, सतत लोकांच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. या काळात पोलिसांचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. नियम न पाळणाऱ्या लोकांना दिलेल्या दंडुक्याच्या प्रसादापासून ते नियम पाळणाऱ्यांना पोलिसांनी दिलेली कौतुकाची थाप असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.