मुंबई, 28 ऑक्टोबर: बॉलिवूडवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मुंबईतल्या ब्रह्मकुमारी ग्लोबल रूग्णालयात गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवकुमार खुराना यांना कोणताही विशेष आजार नव्हता. वाढत्या वयामुळे त्यांचे शरीर सुस्त झाले होते आणि ते आजारी पडू लागले होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आहे. शिवकुमार खुराना असे दिग्दर्शक होते, ज्यांनी अनेक दुस-या फळीतील कलाकारांना लीड भूमिका साकारण्याची संधी दिली. आपल्या दिग्दर्शन कौशल्यानं चित्रपटाची खरी जादू पडद्यावर रंगवणारे अवलिया कलाकार शिव कुमार खुराना यांचा १९९९ साली केलेला ‘जालसाज’ हा अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यांच्या निधनानं बॉलिवूड कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. हेही वाचा - BBM 4: बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडायला लागला अक्षय; नेमकं काय घडलं त्याच्यासोबत? शिव कुमार खुराना यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना नायकाची भूमिका साकारण्याची पहिली संधी दिली. सुनील दत्त यांच्या होम प्रोडक्शनद्वारे निर्मित मन का मीत या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण त्यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांना केवळ खलनायकाच्या भूमिकेसाठीच चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या पण शिव कुमार खुराना यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. शिव कुमार खुराना यांच्या 1971 मध्ये रिलीज झालेल्या हम तुम और वो या चित्रपटात विनोद खन्ना यांनी नायकाची भूमिका साकारली. त्यांनी सत्तर ते नव्वद दशकातील मोठ्या सुपरस्टार कलाकारांना लॉन्च केले होते. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, विनोद खन्ना अशा कलाकारांना त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर गेली जवळपास 35 वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद, रवींद्र महाजनी आणि अनुपम खेर अशा कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह याला 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘करण’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले.आज त्यांच्या निधनांनंतर विंदू दारा सिंह यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
शिव कुमार खुराना यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मिट्टी और सोना, ‘फर्स्ट लव लेटर’, ‘बदनाम’, ‘बदनसीब’, ‘बे आबरू’, ‘सोने की जंजीर’ आणि ‘इंतकाम की आग’ या चित्रपटांचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले आहे. ‘हम तुम और वो’, ‘दगाबाज’ आणि ‘अंग से अंग लगाले’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. शिव कुमार खुराना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.