• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • चिमुकल्याच्या आजाराने अस्वस्थ झाले बिग बी; आयांशसाठी केलं गुप्तदान

चिमुकल्याच्या आजाराने अस्वस्थ झाले बिग बी; आयांशसाठी केलं गुप्तदान

कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या लोकप्रिय शोचा 13वा सीझन सध्या सुरू असून, अमिताभ बच्चन तो शो होस्ट करत आहेत.

  • Share this:
 मुंबई, 11 सप्टेंबर-  बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी लोकप्रिय आहेतच; पण ते त्यांच्या दातृत्वासाठीही ओळखले जातात. कोणे एके काळी ज्यांची स्वतःची कंपनी दिवाळखोरीत निघाली होती, त्यांनी जिद्दीने त्या परिस्थितीवर मात करून गतवैभव प्राप्त केलं. त्यांनी कित्येक शेतकऱ्यांची कर्जं फेडली असून, कोविड काळातही वेगवेगळ्या स्वरूपात भरभरून मदत केली आहे. स्वतः केलेल्या मदतीबद्दल जाहीरपणे बोलायला आवडत नाही, असंही त्यांनी मागे एकदा सांगितलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या दातृत्वाचं आणखी एक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या लोकप्रिय मालिकेचा 13वा सीझन सध्या सुरू असून, अमिताभ बच्चन तो शो होस्ट करत आहेत. या शोचा एक प्रोमो व्हिडिओ नुकताच सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम चॅनेलवर शेअर केला असून, त्यात अमिताभ यांच्या दातृत्वाचं दर्शन घडत आहे.
सोनी टीव्हीने शेअर केलेल्या 'केबीसी 13' एका प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉट सीटवर अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि फराह खान (Farah Khan) बसलेल्या दिसतात. आपणच स्थापन केलेल्या मेंटल हेल्थ फाउंडेशनकरिता निधी उभारण्यासाठी आपण या शोमध्ये सहभागी झाल्याचं दीपिका पदुकोण सांगते. नंतर फराह खान सांगते, की अयांश नावाच्या 17 महिन्यांच्या, एका दुर्मीळ विकाराने ग्रस्त असलेल्या बालकाच्या उपचारांसाठी निधी उभारण्याकरिता ती या शोमध्ये आली आहे. (हे वाचा:अरेच्चा! 'ही तर सोलापुरी चादर'; युजर्सने प्रियांकाच्या पतीला दिली अशी कमेंट) या व्हिडिओत असं दिसतं, की अमिताभ बच्चन अयांशची एका वाक्यात ओळख करून देतात. त्यानंतर अयांशची आई त्याच्या विकाराची माहिती देते. तो जन्मल्यापासून पहिले सहा महिने सगळं काही व्यवस्थित होतं. नंतर त्याच्या हाता-पायांच्या व्यवस्थित हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांनी त्याच्या आजाराचं निदान स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) असं केलं, असं त्याच्या आईने सांगितलं. त्यानंतर फराह खान भावुकपणे सांगते, की अयांश दोन वर्षांचा झाल्यानंतर त्याला झोल्गेनस्मा नावाचा जगातलं सर्वांत महागडं इंजेक्शन दिलं जाणार आहे. त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. ते इंजेक्शन देऊन आम्हाला अयांशचा जीव वाचवायचा आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर अमिताभही भावुक होतात आणि तातडीने म्हणतात, 'ही गोष्ट मी आत्ता तुमच्याशी बोलावी की नाही हे मला समजत नाही; पण मीदेखील व्यक्तिगतरीत्या या कार्याला हातभार लावू इच्छितो. मी किती रक्कम देणार आहे, हे मी नंतर तुम्हाला सांगीन. त्याबद्दल मला इथे चर्चा करायची नाही.' (हे वाचा:... म्हणून मामा ग्रेट! वाचा अशोक सराफ यांचा भावुक करणारा किस्सा) हे ऐकल्यानंतर फराह खान अमिताभ यांचे हात जोडून आभार मानते. अमिताभ यांनी शोच्या माध्यमातून अन्य नागरिकांनाही आवाहन केलं आहे, की जास्तीत जास्त जणांनी यासाठी अर्थसाह्य करावं. अयांशला असलेला स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) या दुर्मीळातला दुर्मीळ जनुकीय विकार आहे. तो 10 हजारांत एखाद्या मुलाला होतो. नर्व्ह सेल्सना क्रियाशील ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोटीनची (Protein) निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेलं एक जनुक (Gene) अयांशच्या शरीरात नाही. त्यामुळे त्याच्यावर जीन थेरपी इन्फ्युजन (Gene Therapy Infusion) करावं लागणार आहे. त्याच्यावरच्या उपचारांसाठी झोल्गेन्स्मा (ZolgenSMA) नावाच्या इंजेक्शनची गरज आहे. हे जगातलं सर्वांत महाग इंजेक्शन असून, त्याची किंमत 2.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 16 कोटी रुपये इतकी आहे.
First published: