मुंबई, 27 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिची चौकशी देखील 5 तास चालली. दरम्यान मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशी दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणला एनसीबीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे रडू कोसळले. 5 तासाच्या चौकशीत दीपिका तब्बल 3 वेळा रडली असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांची अशी माहिती मिळाली आहे की, या चौकशीवेळी तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला देखील दीपिकासमोर आणण्यात आले, आणि दोघींना काही सवाल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार करिश्माच्या WhatsApp चॅटमध्ये अंमली पदार्थाचा उल्लेख केला गेला होता, ज्यामध्ये कथित ‘डी’ नावाच्या व्यक्तीसंदर्भात बातचीत केली गेली आहे. एनसीबी अथितीगृहाबाहेर तैनात एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दीपिका कुलाबा येथील अथितीगृहात सकाळी 9.50 वाजता पोहोचली होती तर ती दुपारी साधार 3.50 च्या दरम्यान बाहेर पडली. करिश्मा आणि दीपिकाला 3.40 दरम्यान एनसीबीने जाण्यास सांगितले होते. आधी करिश्मा बाहेर पडली आणि त्यानंतर दीपिका. दोघी वेगवेगळ्या गाडीतून रवाना झाल्या. (हे वाचा- सुशांतवरील चित्रपटात दिसणार श्रद्धा कपूरचे बाबा, निभावणार NCB अधिकाऱ्याची भूमिका ) या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोणने ड्रग चॅटची कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे तिने Coco क्लबसंदर्भातील बाब देखील मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 2017 चे हे चॅट होते, ज्यामध्ये कोको क्लबमध्ये भेटण्याबाबत भाष्य करण्यात आले होते. दीपिकाने या गोष्टी मान्य केल्या असल्या तरी ड्रग्जबाबत तिने अजून कोणते स्टेटमेंट दिलेले नाही. दीपिकाने असे म्हटले आहे की, आम्ही एखादी सिगरेट पितो पण ते खूप कॉमन आहे. श्रद्धा कपूर-सारा अली खानची देखील झाली चौकशी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी याप्रकरणात अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची देखील चौकशी केली. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी घडलेली मोठी घटना म्हणजे यामध्ये धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज रवि प्रसादची चौकशी झाल्यानंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली आहे. (हे वाचा- ‘…मला माहित नव्हतं याचा अर्थ ड्रग्ज घेणं होतो’,विकी कौशलने केला होता हा खुलासा) एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, सारा आणि श्रद्धाची दक्षिण मुंबईतील बलार्ड इस्टेटमधील एनसीबी क्षेत्रीय कार्यालयामध्ये चौकशी केली गेली. श्रद्धा दुपारी 12 च्या सुमारास चौकशीसाठी दाखल झाली होती तर सारा त्यानंतर तासाभराने तिथे आल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून मिळते आहे. जवळपास साडेचार तास साराची चौकशी झाली आणि ती साडेपाच्या सुमारास एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. श्रद्धाची 6 तास चौकशी झाली ती साधारण 5.55 वाजता कार्यालयातून बाहेर पडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.