मुंबई, 09 जानेवारी: 'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याचं नाव अखेर समोर आलं आहे. मास्टर माइंड अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात दमदार खेळी खेळत अक्षयने विजेतेपदावर नाव कोरलं. तसेच तो या पर्वाचा 'कॅप्टन ऑफ द सिझन' देखील ठरला आहे. खेळाडू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णयक्षमता या गुणांच्या बळावर अक्षयने या पर्वाच विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं. अक्षयचं सगळीकडेच कौतुक होत आहे. पण एकीकडे त्याचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र त्याला ट्रोल देखील केलं जातंय. आता या ट्रोलिंगवर अक्षयची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अक्षयने बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत एक फोटो पोस्ट करत अक्षयने विजेतेपद जिंकल्यानंतर पहिल्यांदाच समोर येत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलंय कि, 'नमस्कार मित्रांनो. सगळ्यात आधी तुम्ही मला जे "क.मा.ल" प्रेम देत आहात त्यासाठी खूप जास्त Thank You तुमच्या सगळ्या मेसेजेस ना reply देऊ शकलो नाही. आणि सगळ्या stories सुद्धा repost करू शकलो नाही. फोन कॉल अजूनही थांबत नाहीयेत आणि तुमचं हे इतकं जास्त प्रेम मला मिळालं त्यासाठी आता काय आणि कोणत्या शब्दात माझे ऋण व्यक्त करू खरंच समजत नाहीये. पण माझ्या संपूर्ण 100 दिवसांच्या प्रवासात जस मला समजून घेतलंत, तसं आताही समजून घ्याल याची मला खात्री आहे.'
हेही वाचा - Akshay Kelkar : रिक्षावाल्याचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; अक्षयनं सार्थकी ठरवले गर्लफ्रेंडचे 'ते' शब्द
पुढे तो म्हणतोय कि, ' आजवर जे काम केलं त्यातून देशातील काही भागांपर्यंत आणि काही घरापर्यंत पोचत होतो, पण आपल्या घरातली कौतुकाची थाप ही बाहेरच्या माणसाच्या कौतुकापेक्षा जास्त हवीहवीशी वाटते. आणि म्हणूनच खरतर माझ्या घरातल्या, "महाराष्ट्रातल्या" आणि "मराठी" माणसांपर्यंत पोचण्यासाठी हा लढा लढलो आणि तुमची शाबासकी 'ती '(Trophy) च्या स्वरूपात पोचली!'
View this post on Instagram
यानंतर त्याच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना अक्षयने लिहिलंय कि, 'कोणताच माणूस परिपूर्ण नसतो! मीही नाही! काहीना मी नाही आवडलो. त्यांच्याही प्रतिक्रिया ते माझ्यापर्यंत पोचवत आहेत. अस म्हणतात की, आपण त्यांच्यावरच असे रागावतो ज्याला आपण आपला मानतो! आरोप प्रत्यारोपांच्या जाळ्यातून देव ही वाचू शकले नाहीत, मी तर साधा माणूस आहे! माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मोठ्या मनाने मला माफ करा. तो एक खेळ होता. एक खेळ म्हणून च मी खेळला आणि त्या व्यतिरिक्त आणि त्या अधिक कधीच काही नव्हते. आई म्हणते गोड पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी त्यात चिमुटभर मीठ टाकतात... असेल...माझ्या या गोड प्रवासात तुम्ही सुद्धा गरजेचे होतात.' असं म्हणत त्याने ट्रोलिंगवर भावना व्यक्त केल्या आहेत.
अक्षयच्या या पोस्टखाली देखील लोकांनी त्याला ट्रोल करणं सोडलं नाही. पण काहींनी कमेंट करत त्याच अभिनंदन देखील केलं आहे. आता हा बिग बॉसवर प्रेक्षकांची असणारी नाराजी कुठपर्यंत टिकतेय ते बघणं महत्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.