मुंबई, 21 डिसेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त्र शो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदी नंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आलं. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. घरातल्या सदस्यांविषयी विविध चर्चा होत असताना आता एक नवीन प्रोमो समोर आला आहे. आता सगळ्या सदस्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. पण येत्या चावडीवर सगळ्यांना एक खास सरप्राईज मिळणार आहे.
नवीन प्रोमोमध्ये या आठवड्यात सदस्यांच्या संयमाचा बांध फुटणार आहे. या प्रोमोमध्ये अपूर्वा नेमळेकर आरोहविषयी म्हणते कि, 'याला एवढं कळत असतं तर याच्या सीझनमध्येच तो जिंकला असता.' त्यावर आरोह काहीच प्रतिक्रिया देत नाही. मात्र आता या आठवड्याच्या चावडीवर सदस्यांना त्यांचे नातलग भेटणार आहेत. अपूर्वा आणि अमृताला भेटायला तिची आई येणार आहे तर किरण मानेची बायको त्यांना भेटायला येणार आहे.
हेही वाचा - Apurva Nemlekar: खूप काही गमावलंय मी... खाजगी आयुष्याबद्दल बोलताना अपूर्वाला अश्रू अनावर
आपल्या घराच्या माणसांना पाहताच सगळे सदस्य खूपच भावुक झाले. अपूर्वा ढसाढसा रडतच आईच्या गळ्यात पडली. तर किरण माने बायकोला पाहून भावुक झाले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले. एरवी राखी सावंतच्या मागे पुढे करणाऱ्या किरण मानेंचा बायकोला पाहून मात्र बांध फुटला. बिग बॉसचा हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठी 4 ची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. चौथ्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांनी एंट्री केली. एकाहून एक तगडे स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या तितकासा पचनी पडला नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. मात्र तरीही प्रेक्षक शो आवर्जुन पाहताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन अखेर प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आता जाता जाता स्पर्धकांना बिग बॉसने ही छान भेट दिली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात आता किरण माने, प्रसाद जवादे अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, अरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत. घरातील 77 वा दिवस पार पडला आहे. त्यामुळे केवळ 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बिग बॉस मराठी 4 प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड फिनाले 8 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीनं अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.