मुंबई, 24 जुलै : ऑनलाइन रमी आणि इतर खेळ खेळण्यासाठी जाहिराती करणाऱ्या अनेक कलाकारांवर आक्षेप घेण्यात आला आहे. ऑनलाइन रमी खेळा अशी जाहिरात करणाऱ्या हिंदी तसेच मराठी कलाकारांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला होता. कलाकारांच्या चाहत्यांनी या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तंबाखूची जाहिरात करणाऱ्या अक्षय कुमारला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. आता त्यानंतर अजय देवगण विरोधात आवाज उठवला आहे. नाशिकमध्ये एका व्यक्तीनं अजय देवगण विरोधात भीक मांगो आंदोलन करत विरोध दर्शवला आहे. नाशिकमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये अजण देवगणच्या विरोधात भीक मांगो आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. तो आपल्या स्कूटीवर फिरून जागोजागी अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन करताना दिसत आहे. अजय देवगण ऑनलाइन गेम्सच्या जाहिराती करतो या गोष्टीच्या तो पूर्णत: विरोधात आहे. त्या व्यक्तीनं आपल्या सायकलवर अजय देवगण विरोधात भीक मांगो आंदोलनाचे पोस्टर्स लावलेत. त्याचप्रमाणे एक छोटा स्वीकर लावून त्यात अभिनेत्याच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसतोय. हेही वाचा - 90च्या दशकात ‘या’ हिरोचा होता जलवा, लागोपाठ 6 ब्लॉकबस्टर सिनेमांनी कमवले होते 200 कोटी भीक मांगो आंदोलन करणारा व्यक्ती व्हिडीओमध्ये म्हणतोय, “मी ऑनलाइन गेमच्या विरोधात आंदोलन करत आहे. ऑनलाइन गेम आपल्या पिढीला बर्बाद करत आहेत. थ्री स्टार क्रिकेटर्स ज्यांना देवाने भरपूर दिलेलं असून ते अशाप्रकारच्या जाहिराती करून आपल्या पिढीला खराब करत आहेत. यासाठी आपण अजय देवगणला भीक मांगो आंदोलन करून पैसे पाठवणार आहोत. मी त्यांना गांधीगिरी स्टाइलनं विनंती करतो की त्यांनी अशाप्रकारच्या जाहिराती करून नये”.
त्याने पुढे म्हटलंय, “जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर मी तुमच्यासाठी भीक मागेन. यासाठी तुमच्या लोकांची साथ पाहिजे. तुमच्या हातात असलेला मोबाईल वापरा. फोटो काढा व्हिडीओ काढा आणि सर्वांना पाठवा. तुमच्या घरातील कोणी या खेळात नसतील तर भविष्यात तुमच्या घरातील एक तरी माणूस या गेममध्ये असणार हे 101 टक्के खरं आहे. हे थांबवण्यासाठी तुम्हा सर्वांना हे करायचं आहे”. अजय देवगण विरोधात पुकारलेल्या भीक मांगो आंदोलन करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांना या व्हिडिओ कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्यात. एका युझरनं लिहिलंय, “चांगला उपक्रम आहे. सलाम सरजी. निदान समाज्याच्या भल्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे चांगलं आहे”. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, “आपला मुद्दा मांडण्याचा चांगला मार्ग आहे”. तर आणखी एका युझरनं लिहिलंय की, “भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करत आहेत. या श्रीमंत लोकांना मी ही भिक देईन”.