मुंबई, 19 जून : प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संवाद या दोन्हींवर टीका होत आहे. सर्व वादांमध्येही ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. ‘आदिपुरुष’ने तीन दिवसांत जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पण आता आदिपुरुषचा विरोध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चित्रपटातील संवादांमुळे संतप्त झालेल्या अयोध्येतील संतांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संतांनी चित्रपटाविरोधात आवाज उठवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या विकृतीवर संतांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटात रामायणातील पात्रांचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून हिंदू देवतांना विकृत पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. चित्रपटाबद्दल रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, यापूर्वी विरोध करूनही चित्रपट निर्मात्यांनी रामायणातील पात्रांचे चुकीचे चित्रण केले आहे आणि हिंदू देव-देवतांना विकृत पद्धतीने दाखवले आहे. ते म्हणाले, चित्रपटातील संवाद लज्जास्पद असून चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
सत्येंद्र दास म्हणाले, ‘‘भगवान राम, भगवान हनुमान तसेच रावण पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. चित्रपटात आपले देव पूर्णपणे वेगळ्या रूपात दाखवले आहेत, जे आपण आजपर्यंत कधीच वाचले आणि पाहीले नाहीत.’’ याशिवाय अयोध्येतील प्रसिद्ध हनुमान गढी मंदिराचे पुजारी राजू दास यांनीही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राजू दास म्हणाले, ‘बॉलिवूडमध्ये नेहमीच हिंदू धर्माचे विकृतीकरण दाखवले जाते. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण आहे.‘अयोध्येतील संतांची सर्वात शक्तिशाली संघटना मणिराम दास चावनी पीठानेही चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. Manoj Muntashir : ‘मी माफी मागायला तयार आहे पण…’ त्या छपरी डायलॉगवर वाद वाढताच लेखकांनी दिली प्रतिक्रिया तर दुसरीकडे काल, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आदिपुरुष चित्रपटाला विरोध करत चित्रपटगृहात चालणारा शो बंद पाडला. पालघरच्या नालासोपारा येथील मल्टिप्लेक्समध्ये रविवारी १८ जून रोजी काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी थिएटरमध्ये आदिपुरुष दाखवला जात होता. आंदोलकांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले, घोषणाबाजी केली आणि मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी वाद घालत शो बंद पाडले. यावेळी आंदोलकांनी ‘तुम्ही तुमच्या मुलांना हा चित्रपट दाखवा, असा चित्रपट बघायला आलात तर लाज वाटेल ‘, असे म्हटले आहे. याचे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.