मुंबई 15 ऑगस्ट: मराठी नाटकांचा प्रेक्षक सद्य बराच वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांना नाटकांमध्ये होणारे वेगळे प्रयोग आवडत आहेत आणि सध्या मराठी नाटकांना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एकीकडे दादा एक गुड न्यूज आहे, एका लग्नाची पुढची गोशर, सही रे सही या आणि अशा अनेक नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळत असताना रंगभूमीवर अजून येऊन नवीन नाटकं येणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे (mukta barve new project) एका मोठ्या गॅपनंतर नाटकामध्ये दिसून येणार आहे. 15 ऑगस्ट 1991 म्हणजे आजच्याच दिवशी 31 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं ‘चारचौघी’ नावाचं नाटक एका नव्या संचात पुन्हा बघायला मिळणार आहे. आजच्या दिवशी हे नाटक एका नव्या ढंगात सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुक्ताने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या या नाटकात वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम यांच्या मुख्य भूमिका होत्या. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयवार भाष्य करणारं आणि स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं हे नाटक त्याकाळी बरंच गाजलं होतं. एकतर असा विषय रंगभूमीवर येणं ही गरज या नाटकाने पूर्ण केली. आता हेच नाटक तब्बल एकतीस वर्षांनी एका नव्या संचात बघायला मिळणार आणि त्यातूनही मुक्ता बर्वेसारखी अभिनेत्री त्याचा भाग असणार हे ऐकून चाहत्यांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे. हे ही वाचा- Independence day 2022: मराठी कलाकारांचा अमेरिकेत डंका; कार्यक्रमाला ‘या’ कलाकारांची उपस्थिती मुक्ताने आजपर्यंत नाट्यरसिकांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून चकित करून सोडलं आहे. मुक्ताचं रंगभूमीशी असलेलं नातं तसं फार जुनं आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी तिला नाटकात काम करताना बघायला एक वेगळी आतुरता दिसून येत आहे.
मुक्ता नुकतीच Y या सिनेमात दिसून आली होती. एका अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आणि त्याला बराच चांगला प्रतिसाद मिळाला. मुक्ता सध्या अशा अनेक कलाकृतींचा भाग होत आहे ज्यातून एखादा महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. तिच्या येणाऱ्या नाटकाकडे सुद्धा प्रेक्षक डोळे लावून असल्याचं दिसून आलं आहे. मुक्ताच्या असंख्य चाहत्यांनी यानिमित्ताने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.