**मुंबई, 03 मे : ‘**हम आपके हैं कौन’ हा बॉलिवूडमधील एक कल्ट सिनेमा आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं हा सिनेमा पाहतात. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि आणि अभिनेता सलमान खान यांनी सिनेमात चार चांद लावलेत. प्रमुख भूमिकेत असलेल्या माधुरीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. दोघांच्या करिअरमधील हा सिनेमा महत्त्वाचा सिनेमा ठरला. हम आपके है कौन या सिनेमाच्या अनेक गमंती जमंती किस्से सातत्यानं समोर येत असतात. असाच आणखी एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मल्टिस्टारर असलेल्या हम आपको है कौन सिनेमानं रेकॉर्ड तयार केला आहे. माधुरी दीक्षित त्यावेळेस आघाडीची अभिनेत्री होती. सेटवरील तिच्या वागणूकीचे अनेक किस्से अनेकांनी सांगत तिचं कौतुक देखील केलं आहे. पण जेव्हा अभिनेत्री हिमानी शिवपुरी सेटवर आल्या तेव्हा माधुरी त्यांच्याशी कशी वागली हा अनुभव त्यांनी सांगितला. माधुरी दीक्षित हम आपके हैं कौनच्या सेटवर सर्वांशी मिळून मिसळून वागायची. सलमान आणि तिची चांगली मैत्री होती त्यामुळे दोघे मिळून सर्वांची मज्जा उडवायचे. कामाच्या वेळी मन लावून काम आणि फावल्या वेळेत कलाकारांनी धम्माल केल्याचे अनेक किस्से आहेत. अभिनेत्री हिमानी शिवपुरी म्हणजेच हम आपके हैं कौन सिनेमातील डॉक्टर काकांची बायको. हिमानी यांची भूमिका देखील लक्षात राहण्यासारखी आहे. हेही वाचा - ‘धिकताना धिकताना’ गाण्यावेळी सेटवर घडला होता भयंकर प्रकार; हम आपके…च्या अभिनेत्रीचा थोडक्यात वाचला जीव सिनेमाचे दिग्दर्शक हिमानी शिवपुरी यांना पहिल्यांदा सेटवर घेऊन आले तेव्हा माधुरी दीक्षितबरोबर त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. माधुरीबरोबरच्या पहिल्या भेटीचा अनुभव हिमानी यांनी सांगितला. राजश्री प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “सिनेमाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या मला पहिल्यांदा सेटवर घेऊन आले. माधुरी दीक्षित सगळ्या कलाकारांबरोबर बसली होती. सूरज यांनी माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, या आहेत हिमानी शिवपुरी. या खूप अनुभवी अभिनेत्री आहेत. सूरज यांचे हे शब्द ऐकले आणि खुर्चीवर बसलेली माधुरी पटकन उठून उभी राहिली”.
हिमानी शिवपुरी पुढे म्हणाल्या, “मी येताच माधुरी दीक्षित उठून उभी राहणं हा माझ्यासाठी फार प्रेरणादायी क्षण होता. तेव्हा ती फार मोठी अभिनेत्री होती. पण तिनं असं काहीही मनात ठेवता. मोठ्या व्यक्तींचा आदर देऊन ती उभी राहिली. हम आपके हैं कौन सिनेमानंतरही मी माधुरी बरोबर अनेक सिनेमात काम केलं. तेव्हा मला कळलं की माधुरी उत्तम अभिनेत्री आहेच पण खूप चांगली माणूसही आहे”.