मुंबई, 01 मे : बॉलिवूडमधील असे काही सिनेमे आहेत जे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. ऑल टाइम ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीतील एक सिनेमा म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या दमदार अभिनयाने भरलेला हा सिनेमा लहान मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं पाहतात. सिनेमातील गाणी आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आजही आपली वाटतात. सिनेमात बरीच धमाकेदार गाणी आहेत. त्यातील धिकताना धिकतान हे गाणं देखील सर्वांच्या पसंतीचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का याच गाण्याच्या शुटींग दरम्यान एका अभिनेत्रीच्या बाबतीत भयंकर प्रकार घडला ज्यानं सगळेच घाबरून गेले होते. निशा आणि प्रेम यांच्या लव्ह स्टोरीमध्ये असलेली सगळीच पात्र दर्जेदार होती. सलमान आणि माधुरी यांच्याबरोबर मोहनिश भल, रीमा लागू, रेणूक शहाणे, बिंदू, लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे, अलोक नाथ, सतीश शहा अशी तगडी स्टार कास्ट सिनेमात होती. प्रत्येक पात्राची वेगळी खासियत होती. त्यातील प्रेमच्या काकीची भूमिका करणारी अभिनेत्री बिंदू सर्वांना आठवत असेल. सिनेमात जरी बिंदू खाष्ट वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्या फार खेळकर आणि सुंदर स्वभावाच्या आहेत. धिकताना धिकताना या गाण्याच्या शुटींगवेळी त्यांनी जे काही केलं ते पाहून सगळेच घाबरून गेले होते. हेही वाचा - ऑनस्क्रिन मरणं रेणूका शहाणेसाठी होतं फार कठीण; रिमा लागू तर ढसाढसा रडल्या होत्या
अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी एका मुलाखतीत हम आपके हैं कौन सिनेमाच्या शुटींग वेळच्या गमती जमती सांगितल्या. त्यावेळी त्यांनी धिकताना धिकताना या गाण्याचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, “त्या गाण्यावेळी बिंदू जींच्या विगला आग लागली होती. धिकताना धिकताना गाण्यात मोहनिश परत येतात आणि दिवाळी असते. सगळे आतिशबाजी करत असतात. आम्ही सगळे हातात फुलबाजी घेऊन ती गोल गोल फिरवत होतो. तर बिंदू यांनी उत्साहाच्या भरात ती फुलबाजी इतकी फिरवली की त्यांनी स्वत:च्या विगला आग लावली होती”.
माधुरी आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हम आपके हैं कौन हा सिनेमा 1994मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाला आज 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. सूरज बडजात्या यांनी सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलं होतं. सिनेमात एकूण 13 दमदार गाणी आहेत. सिनेमासाठी 1995मध्ये माधुरी दीक्षितला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. तर सूजर बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.