मुंबई, 18 फेब्रुवारी: ‘आई कुठे काय करते ’ या मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग पाहायला मिळते आहे. या दोघांचं लग्न धुमधडाक्यात लागणार असून दोन्ही घरी लग्नाची जोरात तयारी सुरु आहे. पण असं असलं तरी मालिकेत रोज वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. अरुंधतीचं लग्न रोखण्यासाठी अनिरुद्ध रोज नवनवीन डाव खेळत आहे. त्यामुळे ते दोघे लवकरच एक होणार असं वाटत असताना त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही संपताना दिसून येत नाहीत. अशातच आता अरुंधतीला चक्क संजना एक सल्ला देताना दिसणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दररोज रंजक अशा घडामोडी सुरुच असतात. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक अगदी खिळून असतात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची गडबड सुरु आहे. मालिकेचा एक नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यानुसार अरुंधती आणि संजना गप्पा मारताना दिसत आहे. अरुंधतीचं दुसरं लग्न होत असताना संजना तिला एक विशेष सल्ला देणार आहे. हेही वाचा - ‘इतक्या’ कोटींना विकला गेला राज कपूर यांचा चेंबूर येथील आलिशान बंगला; किंमत ऐकून येईल भोवळ प्रोमोमध्ये संजना अरुंधतीला म्हणते कि, ‘मी अनिरुद्धसोबत जोपर्यंत काम करत होते तोपर्यंत तो मला सपोर्ट करत होता. पण मी प्रमोद सोबत काम करायला लागले आणि तो बदलला.’ ती पुढे म्हणते, ‘अरुंधती तू एकदा चूक केली आहेस, पुन्हा तीच चूक करू नकोस.’ संजनाचं हे बोलणं ऐकून अरुंधती कोड्यात पडते. आता संजना नेमकं कशाविषयी बोलतेय. संजना अरुंधतीला लग्न न करण्याचा सल्ला देतेय कि अनिरुद्धचं वागणं मनाला लावून न घेण्याविषयी बोलतेय, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अरुंधतीने अखेर काहीही झालं तरी आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पा, यश, अनघा, ईशासोबतच संजनाचा देखील अरुंधतीच्या लग्नाला पाठींबा आहे. पण अनिरुद्धला अरुंधतीने दुसरं लग्न करणं मान्य नाही. अरुंधती दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत असताना अनिरुद्ध चांगलाच बावचळला आहे. तो या दोघांचं लग्न मोडण्यासाठी नवनवीन डाव खेळतो आहे.
तर दुसरीकडे अनिरुद्धच्या या वागण्यामुळे संजना वैतागली आहे. अनिरुद्धशी लग्न करून आपण चूक केली असं तिला वाटतंय. त्यामुळे एकीकडे अरुंधती दुसरा संसार थाटताना संजना आणि अनिरुद्धचा दुसरा संसार देखील मोडणार का ते पाहणं महत्वाचं आहे. आई कुठे… या मालिकेबाबत सतत नवनव्या अपडेट्स जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक असतात. आता मालिकेचं कथानक अतिशय रंजक वळणावर असून पुढे काय होणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.