मुंबई, 05 नोव्हेंबर : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. पण आता सध्या या मालिकेचा ट्रॅक बदललेला पाहायला मिळतोय. अरुंधती मालिकेतून सध्या गायब झाली आहे. पण अरुंधतीच्या घराच्या माणसावर संकट येऊन ठेपलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अप्पांना मोठा आजार झाला आहे. अप्पाना सध्या काहीच लक्षात राहत नाही, काही आठवत नाही. पण घरचे सगळे सदस्य त्यांना हे जाणवू न देण्याचा प्रयत्न करतात. ते अप्पाना या आजाराची जाणीव करून देत नाहीत. पण आता अप्पांचा हा आजार त्यांच्याच जीवावर बेतणार आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार अप्पांच्या जीवावर मोठं संकट येणार आहे. हेही वाचा - Bindi Controversy : ‘टिकली लावून आपण बावळट वाटतो’; ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत स्टार प्रवाहने प्रदर्शित केलेल्या या प्रोमोनुसार देशमुखांच्या घरी अजूनही दिवाळीचा उत्साह आहे. सगळे कुटुंबीय एकत्र बसलेले असतात तेवढ्यात अप्पांचा मित्र घरी येतात. ते ‘अप्पा घरी आले का’ असं विचारतात. कारण लगेच येतो म्हणून बाहेर पडलेले अप्पा अजून घरी आलेलेच नाही. तेवढ्यात अप्पा गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्यावर दिसतायत. आणि त्यांचा ऍक्सिडेंट होतो. पोलिसांना एक डेड बॉडी सापडते. त्या वर्णनानुसार ते अप्पाच असल्याचं आशुतोष यशला सांगतो. ते ऐकून यशला जबर धक्का बसतो.
हे सुरु असताना मालिकेत दुसरीकडे यश आणि गौरीच्या नात्यात दुरावा आला आहे. गौरी यशला कायमचं सोडून जाण्याच्या विचारात आहे. मालिकेत कायम आईच्या बाजूने उभा राहणारा यश आता अरुंधती आणि आशुतोषला एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न करतोय. आशुतोष सोबत नवीन नातं जोडण्यासाठी तो अरुंधतीला पाठींबा देतोय. पण हे करत असताना आता त्याच्याच गौरीसोबतच्या नात्याची घडी विस्कटणार कि तो समजूतदारपणे हे सांभाळणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. गौरी यशला कायमची सोडून जाणार का आणि अरुंधती हे सगळं कसं सांभाळणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल.
या कथानकामुळे मालिकेला नवीन वळण लागणार आहे. आता अप्पांचा खरंच मोठा अपघात झालाय कि ते वाचले आहेत हे येणाऱ्या भागात कळेल. आई कुठे काय करते’ करते मालिकेचा टीआरपी घसरून मालिकेचा क्रमांक घसरला होता. पण मालिकेतील रंजक वळणांमुळे ‘आई कुठे काय करते’ ने बाजी मारली असून या आठ्वड्यात मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे.