मुंबई, 09 मार्च : आई कुठे काय करते या अत्यंत संवेदनशील विषयाला हाल घालून तीन वर्षांपूर्वी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. आई कुठे काय करते असं मालिकेचं नाव ऐकूनच मालिकेबद्दल उत्सुकता वाढू लागली. प्रत्येक घरातील हक्काची व्यक्ती, घर सांभाळणारी आई. आई हा विषय केंद्रस्थानी असलेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती. साधी, भोळी, घर सांभाळणारी, नवऱ्याच्या मर्जीत राहणारी. स्वत:आधी कुटुंबाचा विचार करणारी अरुंधती सर्वांच्या पसंतीस पडली. हिच अरुंधती जेव्हा नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नानंतर स्वत: दुसरं लग्न घेण्याचा निर्णय घेते तेव्हा मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. पण खमकी सासरा, सून आणि मुलाच्या मदतीनं आणि स्वत:च्या जिद्दीनं बोहल्यावर चढललेली अरुंधती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील आईचं लग्न असलं तरी “आईचं लग्न” हा विषय बाहेरही तितकाच चर्चिला जात आहे. आई कुठे काय करते मालिकेची नायिका अरुंधती आणि आशुतोषचं लग्न आहे. मागील 2 आठवड्यांपासून अरुंधतीच्या लग्नाची पळापळ मालिकेत पाहायला मिळत आहे. नात्यांची बांधिलकी, घरातील माणसांचे भिन्न स्वभाव, विचार याचा एकत्रीत मिलाप सध्या पाहायला मिळत आहे. आईनं दुसरं लग्न करणं हा विचार आजही अनेकांच्या विचारात न बसणारा आहे पण तेच वडिलांनी दुसरं लग्न केलं तर त्यांना विचारणारं कोणीही नसतं. महिलांना आजही त्याच ठरावीक आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही आणि मालिकेत नेमका हाच विचार अगदी उत्तमरित्या हाताळण्यात आला आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा सासू -सासरे आपल्या सूनेचं लग्न लावून देताना पाहायला मिळणार आहेत. मुलं आईच्या लग्नात धम्माल करणार आहे. तिची सवत लग्नात दणकूण नाचणार आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : सासू लावणार सूनेचं लग्न; अखेर कांचनचा अरुंधती - आशुतोषच्या लग्नाला होकार मालिकेत जरी अरुंधतीनं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला असला तरी यासाठी तिला अनेक संकटांना तोंड द्याव लागलं. विशेष म्हणजे या मालिकेच्या प्रोमोमध्येही काही प्रेक्षक अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नावर नाराज दिसतात. समाजात असा निर्णय घेताना नेहमी बाईवर टीका होते, अरुंधतीच्या बाबतीतही तसंच होत आहे. आईचं लग्न..अशी काही टीका देखील तिच्यावर होत आहे. पण एक गोष्ट छान म्हणायला हवी, या सगळ्या विरोधाला झुगारून मालिकेच्या निर्माता, लेखन यांनी अरुंधतीचं दुसरं लग्न लावून एक चांगला निर्णय घेतला आहे. याचविषयी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं देखील एक खास पोस्ट लिहिली आहे.
मालिकेतील अरुंधतीच्या लग्नाच्या फोटोंचा सुंदर व्हिडीओ शेअर करत मधुराणीनं लिहिलंय, “अरुंधतीचं लग्न….हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये. पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का? लग्न आहे ते… साजरं करावं”.
या पोस्टसह मधुराणीनं मालिकेच्या निर्मात्यांचे आणि वाहिनीचे देखील आभार मानले आहेत. तिनं लिहिलंय, “हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाहचे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे”.